खेड प्रतिनिधी | रत्नागिरी, ३० जुलै
मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील भोस्ते घाटात बुधवारी सकाळी एक कंटेनर उलटल्याची घटना घडली. हा कंटेनर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर उतारावर असताना ब्रेक फेल झाल्यामुळे ते अनियंत्रित झाले आणि थेट रस्त्यावर उलटला.
भोस्ते घाटात यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. तीव्र उतार आणि अवघड वळणांमुळे हे ठिकाण वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. याठिकाणी अपघातांमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते आणि काहीवेळा जीवितहानीही होते. स्थानिक नागरिकांसह व वाहनचालकांनी अनेक वेळा सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. वळणांवर सावधतेचे फलक, स्पीड ब्रेकर आणि ब्रेक तपासणी केंद्रे अशी पायाभूत सुविधा देण्याची गरज वारंवार अधोरेखित केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून या मागण्यांकडे अद्याप दुर्लक्ष होत असल्याची पहावयास मिळत आहे. या अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिस आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे ती लवकरच पूर्वपदावर आली. आता या मार्गावर सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.












