३00 किल्ल्यांची यशस्वी सफर करणारा रत्नागिरीचा दुर्गसेवक निखिल जामसंडेकर

खेड । प्रतिनिधी:

रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा गावातील सुपुत्र आणि दुर्गवेडा निखिल जामसंडेकर याने तब्बल ३०० किल्ल्यांची सफर पूर्ण करत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. इतिहास आणि शिवछत्रपती यांच्यावरील प्रेमातून प्रेरित होऊन निखिलने हे आव्हान पेलले असून, आजवर अनेक दुर्ग, शिखरे आणि जंगल सफारी त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.
निखिल सध्या रत्नागिरी येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून कार्यरत आहे. २०१५ साली चिखली पोस्ट ऑफिसमध्ये त्याची नियुक्ती झाली होती. त्या वेळेपासून त्याने दुर्गभ्रमंतीचा छंद जोपासायला सुरुवात केली. वयाच्या केवळ २३व्या वर्षी त्याने किल्ल्यांवर चढाई सुरू केली होती.
त्याने आतापर्यंत कलावंतीण दुर्ग, कळसुबाई, साल्हेर, सालोटा यांसारखे महाराष्ट्रातील आव्हानात्मक किल्ले सर केले आहेत. त्याचबरोबर प्रचितगड, मुगगड, विजापूर यांसारखे संगमेश्वर तालुक्यातील अतिशय धोकादायक किल्ल्यांवरही यशस्वी चढाई केली आहे.
इतिहासाची गहिरे आवड आणि शिवरायांवरील नितांत प्रेमामुळे त्याचा हा छंद अधिक प्रगाढ झाला आहे. यासाठी तो सतत इतिहास व दुर्ग विषयक पुस्तकांचा अभ्यास करत असतो. बी.ए. शाखेतील पदवीधर असलेला निखिल आपल्या मित्रमंडळींबरोबर गडसंवर्धनाची कार्ये देखील करत असतो.
त्याच्या या प्रवासात प्रणव मापुस्कर, प्रशांत वैद्य, नरेंद्र जाधव, भाई गांधी या दुर्गसेवक मित्रांनी मोठे सहकार्य केले आहे. किल्ल्यांवर जाऊन इतिहास अनुभवणं आणि त्या ठिकाणी स्वच्छता, माहिती देणे, किल्ल्यांचे जतन यावर भर देणारा निखिल सध्या राज्यातील उरलेले सर्व किल्ले सर करण्याच्या निर्धारात आहे.
“छत्रपतींचा इतिहास आणि गड-किल्ले हे आपले वैभव आहे, त्यांना प्रत्यक्ष अनुभवणं, जपणं हे आपलं कर्तव्य आहे,” असं मत निखिलने व्यक्त केलं.
त्याच्या या दुर्गप्रेमास रत्नागिरी जिल्ह्यातून आणि सोशल मीडियावरून मोठा प्रतिसाद मिळत असून, तरुणांसाठी तो एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे.