चिपळुणात १० ऑगस्ट रोजी भाजपातर्फे तालुकास्तरीय शालेय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा

चिपळूण (वार्ताहर) : भारतीय जनता पार्टी (जिल्हा रत्नागिरी उत्तर विभागातर्फे) शहरातील हॉटेल अतिथी मंगल कार्यालय येथे १० ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय शालेय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा शालेय स्तरावर एकूण ३ वयोगटात घेण्यात येणार आहे.
यात इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सातवी आणि आठवी ते बारावी असे ३ गट असणार आहेत. सध्या मोबाईल आणि इंटरनेटच्या विश्वात रमणाऱ्या तरुण पिढीमध्ये संयम आणि कलात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, तसेच बुद्धिबळ या अप्रतिम खेळाची मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी, हा या स्पर्धेचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे सदर स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्पर्धेचे मुख्य आयोजक तसेच भाजपा रत्नागिरी उत्तर विभागाचे अध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडून करण्यात आले आहे. सदर स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्यासाठी सर्व पालकांनी तसेच विद्यार्थांनी निलेश साळवी ९५२७६८०७०१, साहस नारकर ९६६५३४९०५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.