चंद्रमानस कविता संग्रह म्हणजे विविधांगी शब्द सुमनाने नटलेले काव्य पुष्प

कवी विजय कदम यांचा कविता संग्रहाला वाचकांची पसंती

चिपळूण (वार्ताहर) कला ही जीवनाची सावली आहे. मग ती कला कोणतीही असो. असेच गायन, वादन आणि संगीत क्षेत्रात कलेचे उपासक असणारे आणि अनेक पैलू ज्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये दिसून येतात, असे कवी विजय लक्ष्मण कदम यांचा चंद्रमानस हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. चिपळूण मधील प्रसिद्ध डॉ. यतीन जाधव हे या कविता संग्रहाचे प्रकाशक आहेत. अगदी सहज रित्या आणि साध्या शब्दात या कवितसंग्रहातील रचना केल्या असून एक वेगळा कवी आविष्कार कवितासंग्रहातून बघायला मिळत आहे.

 

चिपळूण तालुक्यातील कान्हे या गावचे सुपुत्र असणारे कवी विजय कदम यांनी चंद्रमानस या कविता संग्रहाची निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वीच या कविता संग्रहाचे प्रकाशन सुद्धा झालेले आहे. या कवितासंग्रहासाठी कवी व भाषा अभ्यासक अरुण इंगवले यांनी सुंदर प्रकारची प्रस्तावना सुद्धा लिहिली आहे. चंद्रमानस या कवितासंग्रह मध्ये एकूण ५१ वेगवेगळ्या प्रकारच्या कविता संग्रहित केल्या आहेत. त्यामध्ये विशेषतः उल्लेखनीय ” मृदगंध, कंकण हाती, माझ्या मराठीच्या, जिवा लागली आस, मी मला शोधीताना , मोगऱ्याचे फुल, पाऊसधारा अशा अनेक प्रकारच्या वेगळ्या धाटणीच्या कविता आपल्याला या चंद्रमानस कविता संग्रहामध्ये वाचायला मिळतात. विजय कदम यांच्या अनेक पैलू पैकी पडद्यामागे राहिलेला आहे एक पैलू म्हणजे काव्य गुण होय. कवी म्हणून ते फारसे कोणाला परिचित नाहीत. मात्र गायक, वादक हीच त्यांची विशेषता समाजामध्ये ओळख आहे. परंतु चंद्रमानस या कविता संग्रहाच्या माध्यमातून विजय कदम यांची एक नवी ओळख अधोरेखित होत आहे. त्यांनी अतिशय साध्या शब्दांमध्ये कवितांची मांडणी केलेली आहे. अशी सांजवेळ या कवितेची रचना अतिशय उत्तम असून भावगीता सारखीच वाटते. स्त्रीभ्रूण हत्या बोधकव्य, यासारख्या कविता समाज प्रबोधनाचा वसा घेऊन वाटचाल करतात असे या कवितेतून दिसून येते. यांच्या कवितेमध्ये गझल रचना शास्त्राचा सुद्धा एक भास दिसून येतो. श्री. कदम यांनी एक उत्तम प्रकारचा गझलाशास्त्राचा अभ्यास केला तर ते उत्तम प्रकारचे गझलकार होऊ शकतात अशा प्रतिक्रिया सुद्धा काही मान्यवरांनी दिल्या आहेत. “खुळावला हा पाऊस”या कवितेमध्ये अतिशय उत्तम प्रकारे निसर्ग चित्राचे वर्णन आपल्याला पहावयास मिळते.

ग्रामीण भागातील प्रतिभावंत व्यक्तिमत्वाने आपल्यातील कविता करण्याचा गुण आणि त्या गुणाला प्रदर्शित करीत एक चांगल्या प्रकारचा कवितासंग्रह वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिला आहे. यासाठी खर तर डॉक्टर यतीन जाधव यांनी सुद्धा त्यांना उत्तम प्रकारे सहकार्य केले आहे. रिया ग्राफिक चिपळूण यांनी मुद्रक म्हणून काम पाहिले आहे, तर मुख पृष्ठ व अक्षर जुळवणे साई ग्राफिक्स चिपळूणचे सुरेश काजारी यांनी केले आहे. मुखपृष्ठ सजावट कुमारी आभा यतीन जाधव हिने अतिशय कल्पकतेने केलेले आहे. या मुखपृष्ठावरून चंद्रमानस कवितासंग्रहाची प्रचिती दिसून येते. अरुण इंगवले यांचे सुद्धा यासाठी मोठे सहकार्य लाभल्याचे कवी विजय कदम सांगतात. या सगळ्यांच्या माध्यमातून चंद्रमानस कविता संग्रह वाचकांसमोर आलेला आहे. एका वेगळ्या उंचीवर आणि अपेक्षा वाढवणार हा कविता संग्रह असल्याचे वाचकांच्या प्रतिक्रियेतून न मत व्यक्त होत आहे.