रत्नागिरी – हातखंबा शाळेजवळ सोमवारी सकाळी गॅस टँकरच्या झालेल्या भीषण अपघातानंतर ग्रामस्थांनी सुरू केलेलं ठिय्या आंदोलन आता मागे घेतलं असून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. मात्र, अपघाताची मालिका सुरूच असल्याने निवळी व हातखंबा परिसरातील नागरिकांमध्ये अजूनही तीव्र भीतीचं वातावरण आहे.
आज सकाळी रस्ता सोडून गॅस टँकर एका चहा टपरीत घुसला, आणि दोन ते तीन दुचाकींना धडक दिली. ही टपरी शाळेजवळ असल्यामुळे अधिकच चिंता निर्माण झाली होती. सुदैवाने शाळेची मधली सुट्टी सुरू झाली नव्हती आणि मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना बाहेर जाऊ दिलं नव्हतं, त्यामुळे ५० विद्यार्थी थोडक्यात बचावले.
गेल्या दीड ते दोन महिन्यांतील हा दुसरा अपघात असून निवळी येथेही आज एक टँकर कलंडलेल्या स्थितीत आढळला आहे. याआधी निवळी येथे एलपीजी गॅस टँकरच्या अपघातामुळे घरांना आग लागली होती.
टँकर वाहतुकीचे प्रमाण, रस्त्याची अवस्था आणि नियंत्रण नसल्यानं ग्रामस्थ चिंतेत असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.
हातखंबा आणि निवळी परिसरात गॅस टँकर अपघातांचं सावट कायम आहे.











