UPDATE : भाट्ये बुलेट-ॲक्टिव्हा अपघात; बहिणींसह चार जण जखमी, बुलेट चालकाची प्रकृती चिंताजनक

रत्नागिरी : प्रतिनिधी

भाट्ये गावाजवळ बुधवारी दुपारी झालेल्या बुलेट आणि अ‍ॅक्टिव्हा दुचाकीच्या जोरदार धडकेत चार जण जखमी झाले असून, बुलेट चालकाची प्रकृती गंभीर आहे. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवले जाणार आहे.

ही घटना बुधवार ६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी ते पावस मार्गावर भाट्ये गावाच्या फाट्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या बुलेट दुचाकीची (MH-08-AW-4050) समोरून येणाऱ्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीला (MH-08-AZ-1824) जोरदार धडक बसली. या अपघातात बुलेट चालक राजेश दिनकर किर (वय ४१, रा. रनपार, रत्नागिरी), त्याच्यासोबत असलेले मिलिंद कृष्णा महाडिक (वय ४७, रा. फणसोप, रत्नागिरी), अ‍ॅक्टिव्हा चालवणारी मानसी राजेंद्र पवार आणि तिची बहिण ऋद्राक्षा पवार (दोघीही रा. खोतवाडी, भाट्ये) हे चौघे जण जखमी झाले.

राजेश किर हे त्यांच्या बुलेटवरून मिलिंद महाडिक यांच्यासोबत पावसकडे निघाले होते. त्याच वेळी मानसी पवार आपल्या बहिणीसोबत अ‍ॅक्टिव्हावरून कॉलेजकडे जात होती. भाट्ये फाट्याजवळ अचानक बुलेटचा ताबा सुटल्याने ती समोरून येणाऱ्या अ‍ॅक्टिव्हावर आदळली. धडक इतकी भीषण होती की बुलेट चालक राजेश किर रस्त्यावर फेकले गेले आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे चित्र घटनास्थळी दिसून आले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, माजी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र भाटकर आणि शहर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. तिथे प्राथमिक उपचारानंतर इतर तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले, मात्र राजेश किर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोल्हापूर येथे हलवण्याची तयारी सुरू आहे.

या अपघाताची नोंद सायंकाळपर्यंत शहर पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या घटनेमुळे रत्नागिरी-पावस मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.