रत्नागिरी – उदय सामंत प्रतिष्ठान तर्फे आयोजित ‘स्मार्ट श्रावण सखी’ या उपक्रमाची अंतिम फेरी येत्या रविवार, दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे पार पडणार आहे.
स्त्रीत्वाचा उत्सव ठरणाऱ्या या स्पर्धेत ब्युटीशियन, वकील, शासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या तसेच गृहिणी अशा विविध क्षेत्रांतील महिलांनी आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाचा उत्तम संगम सादर केला. स्वतःच्या आवडीनिवडी, स्वप्ने, बकेट लिस्ट याबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त होताना स्पर्धकांनी सौंदर्याबरोबरच विचारांची परिपक्वता दाखवून दिली.
स्पर्धेतील अनुभवाबद्दल विचारले असता एका स्पर्धकाने सांगितले, या स्पर्धेतून आम्हाला आत्मविश्वास आणि आनंद मिळाला, तर दुसरी म्हणाली, सर्व स्पर्धकांची तयारी इतकी उत्तम आहे की माझ्यातील खास गुण ओळखणे कठीण आहे. या प्रतिक्रिया आयोजकांसाठीही विशेष ठरल्या.
प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या ५४ स्पर्धकांपैकी २१ सखींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे – मैथीली संदेश लांजेकर, श्वेतांबरी प्रफुल्ल शिर्के, प्रियदर्शनी लक्ष्मीकांत सावखेडकर, अनघा अमोल नाचणकर, तृप्ती हर्षद रेडीज, ऋतुजा महेंद्रकुमार कदम, जेनी मच्छिंद्र चव्हाण, पूनम नितीन पाटील, श्वेता सुरेश यादव, रिमा अजय देसाई, सौम्या सुधेन्दू घुडे, दिशा संदेश भाटकर, दिपीका दिनेश कुबल, प्रिती प्रशांत रसाळ, कुमुदिनी प्रकाश शेट्ये, अंजनी संदिप तांबे, विजेता विजय मोर्ये, संपदा प्रमोद सावंत, योगिता विजय खांडेकर, समिक्षा संतोष कोळेकर आणि राधिका सुमीत नागवेकर.
या स्पर्धेतून महिलांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याचे समाधान सहभागींच्या चेहऱ्यावर झळकत होते. अंतिम फेरीत सख्या आपला आत्मविश्वास, कलेचा आणि बुद्धीचा अद्भुत संगम सादर करणार आहेत.
शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सख्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













