होडावडा येथे एनडीआरएफच्या वतीने आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण 

सावंतवाडी । प्रतिनिधी : यंदाच्या पावसाळ्यात पूरग्रस्त झालेल्या होडावडा गावातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे, याचे धडे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) वतीने देण्यात आले. दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी होडावडा ग्रामपंचायत येथे हा आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

इन्स्पेक्टर आर. जे. यादव यांच्या नेतृत्वाखालील १५ जणांच्या एनडीआरएफ टीमने ग्रामस्थांना सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये भूकंपापूर्वी आणि भूकंपानंतर घ्यावयाची काळजी, आग आणि वनव्यासारख्या परिस्थितीत बचाव कसा करावा, सर्पदंश झाल्यास तातडीने काय उपाययोजना कराव्यात आणि विषारी सापांची ओळख कशी करावी, याविषयीची माहिती देण्यात आली. याव्यतिरिक्त, आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध घरगुती साहित्याचा वापर करून जीव वाचवण्यासाठीच्या सोप्या आणि प्रभावी उपाययोजनांबद्दलही प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी वेंगुर्ला तहसीलदार श्री. ओंकार ओतारी यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी मंडळ अधिकारी सौ. प्रेरणा गिरप, तलाठी सौ. नेहा गावडे, पोलीस पाटील मनोज होडावडेकर, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. गावकऱ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्त्वाचे धडे आत्मसात केले, ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

 

फोटो –

होडावडे येथे आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षणात सहभागी झालेली एनडीआरएफची टीम.