खेड, दि. ७ ऑगस्ट २०२५ – लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आज एक हृदयस्पर्शी आणि समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या मोठे बंधू वैभव विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त घराडी येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ, फळे आणि भाज्या भेट स्वरूपात देण्यात आल्या.
या प्रसंगी येणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत विद्यालयातील बहिणींनी लायन्स क्लबच्या सदस्यांना राख्या बांधल्या. आपुलकी आणि स्नेहभाव व्यक्त करणाऱ्या या उपक्रमामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. डोळस विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी जीवनातून लायन्स क्लब नेहमीच शिकत आणि प्रेरणा घेत असल्याचे लायन रोहन विचारे यांनी यावेळी सांगितले. तसेच या मुलांच्या मदतीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या उपक्रमामुळे घराडी अंध विद्यालय आणि लायन्स क्लब यांच्यातील नाते अधिक दृढ झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका सेनगुप्ता मॅडम यांनी लायन्स क्लबचे कौतुक करताना सांगितले की, प्रियजनांचे वाढदिवस अशा सामाजिक संस्थांमध्ये साजरे करून ते खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपत आहेत. या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, लायन विवेक कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.










