साटवली केंद्र शाळेचा स्तुत्य उपक्रम
संतोष कोत्रे l लांजा -: आज शनिवारी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असताना तालुक्यातील साटवली केंद्र शाळेच्या विद्यार्थिनींनी वृक्षांना राख्या बांधून वृक्षवल्ली आम्हा सोयरे चा संदेश दिला .
बहिण आणि भावाच्या पवित्र प्रेमाचा खरा दिवस म्हणजे रक्षाबंधन होय. या निमित्ताने राखी बांधून प्रत्येक बहीण आपल्या भावाला आपल्या रक्षणाचे कर्तव्य बजावावे असे सांगत असते. याच धर्तीवर साटवली जि.प.केंद्र शाळेमध्ये देखील रक्षाबंधनाचा सण आज शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. वृक्षाचे मानवी जीवनातील असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता आजच्या घडीला वृक्ष संवर्धन करणे हे तितकेच महत्त्वाचे ठरते आहे. आणि म्हणूनच वृक्ष हा देखील आपला एक भाऊच आहे असे मानून जि. प. केंद्र शाळा साटवलीच्या ३० विद्यार्थीनींनी शाळेतील वृक्षांनाच राखी बांधून अनोख्या पद्धतीने हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यामध्ये शाळेतील विद्यार्थीनींसह अंगणवाडीतील मुली देखील सहभागी झाल्या होत्या.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिवाळे तसेच सहकारी शिक्षिका श्रीम. शिदे, श्री. माने, श्री. वीर, सौ. बाणे , व सौ. कालकर यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला..













