चिपळूण : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील मधलीवाडी हनुमान मंदिर परिसरात घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कुटुंबीय घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दरवाजे उचकटून त्यातील लॉकर फोडत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या चोरीमध्ये अंदाजे ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (अंदाजे ५० हजार रुपये), १० हजार रुपये किमतीची चांदीची गणेशमूर्ती, मोदक व पैजण, तसेच २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे.
याप्रकरणी राम शिवराम कदम (वय ७०, व्यवसाय निवृत्त, रा. पिंपळी खुर्द, मधलीवाडी हनुमान मंदिर परिसर, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घरफोडी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात २५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.













