चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम काम सुरू असून भोस्ते घाटातील काम हे पूर्ण झालेले आहे असे सांगितले जाते परंतु भोस्ते घाटातील वाकण हे अतिशय अवघड तीव्र उताराचे व अपघाती झालेले आहे. या अवघड अपघाती वळणावर मोठ्या प्रमाणात वाहनांचे अपघात होत आहेत व मनुष्यहानीही होत आहे, त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. तरी सदरचे अपघाती वळण हे पूर्णतः काढून बाजूच्या डोंगराचा भागाचे कटींग करून उतार व मोठे वळण कमी करण्यात यावे. अन्यथा सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेऊन आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शौकत मुकादम यांनी दिला आहे.
तसेच या ठिकाणी फार मोठे वाकण असल्यामुळे मुंबई-गोवा वाहतुकीला हे वळण धोकादायक आहे. तरी दोन महिन्याच्या आत भोस्ते घाटातील तीव्र उतार व वळण कमी न केल्यास कोकणातील सर्व राजकीय पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, याची सर्व जवाबदारी आपल्या खात्यावर राहील. तरी आपण जातीने लक्ष घालून वरील प्रश्न मार्गी लावावा, असे निवेदन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग पेण यांना माजी सभापती पर्यावरण प्रेमी शौकत मुकादम यांनी दिले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत कळंबस्ते उपसरपंच गजानन महाडिक, भरारी पथकाचे विकास जोरवेकर, मयुर कदम तसेच अधिकारी उपस्थित होते.
फोटो फाईल- सीपीएन२७-२












