बैलगाडा शर्यतीमधील नामवंत बैलांनी आणली महोत्सवात रंगत!
*चिपळूण (संतोष सावर्डेकर):-* वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी महोत्सव पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह कोकणवासीय तसेच विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली आहे. या महोत्सवातील कृषी क्षेत्राशी सलग्न असलेले स्टॉल्स कृषी विषयक शासकीय योजना याविषयी माहिती घेताना प्रत्येक जण दिसत असून आपण देखील शेती पूरक व्यवसाय केले पाहिजेत, अशी चर्चा या सर्वांमधून ऐकावयास मिळत आहे. तर दुसरीकडे बैलगाडा शर्यती गाजवलेले प्रसिद्ध बैल पाहण्यासाठी कोकण वासियांची अलोट गर्दी लोटली आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे शेती व पशुपालन आधुनिक व्हावे आणि ग्रामीण भागातील जीवन समृद्ध व्हावे या उद्देशाने स्थापन झालेली वाशिष्ठी डेअरी कोकणच्या मातीशी जुळवून शेतकरी आणि दुग्ध उत्पादकांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत स्थापनेपासूनच कार्यरत आहे. दिनांक ९ जानेवारीपासून सुरू झालेल्या या महोत्सवात पशुधन प्रदर्शन कार्यशाळा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चांगलीच रंगत आहे. कृषी महोत्सवाचे प्रदर्शन झाल्यापासून सदरील महोत्सव पाहण्यासाठी कोकणवासियांनी एकच गर्दी केली आहे. प्रत्येक स्टॉल्सना भेटी देत माहिती घेतली जात आहे. स्टॉल्स धारक देखील तितक्याच तत्परतेने प्रत्येकाला माहिती देताना दिसत आहेत. या कृषी महोत्सवामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडतेच आहे. शालेय विद्यार्थी देखील या कृषी महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कृषी क्षेत्राविषयी माहिती जाणून घेत आहेत. याचबरोबर पशुधन आवर्जून पाहत आहेत.
तर दुसरीकडे बैलगाडा शर्यतीतील नामवंत बैलांना देखील महोत्सवात त प्राचारण करण्यात आले आहे. यामध्ये द्वादशम हिंदकेसरी शक्तिशाली बलशाली रांगडा बैलगाडा शर्यतीमधला सेलिब्रिटी मुळशीचा ‘बकासुर’ याचे सोमवार दिनांक ५ रोजी कृषी महोत्सवात रॉयल एन्ट्री झाली. यावेळी हा ‘बकासुर’ पाहण्यासाठी कोकणवासीयांनी मोठी गर्दी केली होती. या बकासुरचे वाशिष्ठी परिवारातर्फे दणक्यात स्वागत करण्यात आले. तर मंगळवार दिनांक ६ रोजी ट्रिपल हिंद केसरीचा मानकरी रुबाबदार देखणा शर्यतींचा राजा प्रसिद्ध किल्ला ‘लखन’ची देखील दिमाखात कृषी महोत्सवात एन्ट्री झाली. या लखनचे देखील मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या ‘लखन’ला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. दोन्ही नामवंत बैल तितक्याच रुबाबदारपणे चाहत्यांना प्रतिसाद देत होते. ‘बकासुर’ व ‘लखन’ चे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी स्वागत केले. या महोत्सवात आलेल्या बाल-आबाल वृद्ध, महिला फोटो काढण्यासाठी गर्दी करीत होते या महोत्सवामुळे कोकणवासीयांना बैलगाडा शर्यती मधील नामवंत बैलांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली आहे व माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. याबद्दल कोकणवासीयांनी वाशिष्ठी परिवाराला धन्यवाद दिले आहेत.













