खेड –प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवत आज खेड तालुक्यातील वेरळ येथील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम लायन सागर करवा यांचे पिताश्री श्री. मदनगोपाळ शेठ करवा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा वेरळ क्रमांक 1 तसेच जिल्हा परिषद शाळा वेरळ या शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके यांसारखे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच मुलांच्या आनंदात भर घालण्यासाठी खाऊचेही वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि त्यांचा उत्साह वाढावा हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, लायन विवेक कदम, संदीप मोरे, मदनगोपाळ करवा तसेच वेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. कदम आणि शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असे उपक्रम भविष्यातही सुरू राहतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले.













