गणेशोत्सवानिमित्त मळगावातील चाकरमान्यांसाठी मोफत बससेवा

मळगाव ग्रामविकास मंडळ मुंबईचा प्रेरणादायी उपक्रम 

न्हावेली । प्रतिनिधी : कोकणवासीयांचा सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवानिमित्त मुंबईत राहणाऱ्या मळगावमधील चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्रवासाच्या तिकीटाची समस्या लक्षात घेऊन, मळगाव ग्रामविकास मंडळ, मुंबई यांनी आपल्या गावातील गणेश भक्तांसाठी मुंबई ते मळगाव अशी मोफत बससेवा सुरू केली आहे. यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची दमछाक वाचणार असून, त्यांना कोणत्याही आर्थिक भाराशिवाय आपल्या गावी पोहोचता येणार आहे.

ही विशेष बससेवा सोमवार, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून निघणार आहे. या सेवेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष लाडकोबा गावकर आणि सचिव पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.

गावी जाणाऱ्या मुंबईतील मळगाववासियांनी या संधीचा लाभ घेऊन एकत्रितपणे प्रवास करावा, असे मंडळाने म्हटले आहे. या मोफत बससेवेबद्दल अधिक माहितीसाठी मंडळाचे सचिव पांडुरंग राऊळ यांच्या ९९६७३३३१०० या क्रमांकावर संपर्क साधता येईल. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.