नवी दिल्ली : महाराष्ट्रासह चार राज्यांमधील पाच लोकसभा जागांवर पोटनिवडणुका घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. या जागांमध्ये पुणे, चंद्रपूर (महाराष्ट्र), गाझीपूर (उत्तर प्रदेश), वायनाड (केरळ), अंबाला (हरयाणा) यांचा समावेश आहे. मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर तसेच शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. ते वायनाडमधून निवडून आले होते.
राहुल गांधी व अफझल अन्सारी यांना स्वतंत्र प्रकरणांमध्ये अपात्र ठरविल्याने अनुक्रमे वायनाड व गाझीपूर लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. भाजपचे दोन खासदार गिरीश बापट व रतनलाल कटारिया, काँग्रेसचे खासदार सुरेश धानोकर यांच्या निधनामुळे अनुक्रमे पुणे, अंबाला, चंद्रपूर येथील लोकसभा जागा रिकाम्या झाल्या. या पाचही लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणे आवश्यक आहे.











