तायक्वाँदोचा आत्मसंरक्षणासाठी शाळा, महाविद्यालय पातळीवर समावेश झाला पाहीजे : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : तायक्वाँदो हे केवळ स्पर्धेपुरते मर्यादीत न राहता आत्मसंरक्षणासाठी त्याचा शाळा, महाविद्यालय पातळीवर ही समावेश झाला पाहीजे. यामधून प्रत्येक मुलगी स्वत:चे संरक्षण करु शकेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेचे शिवधनुष्य उत्कृष्टरित्या पेलणार्‍या युवासेना पदाधिकार्‍यांचे कौतुक करताना या स्पर्धेचा आदर्श अन्य जिल्ह्यांनीही घ्यावा असे आवाहन केले.

मारुती मंदिर येथील क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या 33 व्या राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. मंत्री सामंत आणि सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरु आहे. पालकमंत्री सामंत यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी सामंत म्हणाले, तायक्वाँदो हा खेळ दहा-पंधरा वर्षापूर्वी कुणाला माहितही नव्हता. मात्र या खेळामधूनही शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे व त्या खेळावर पी.एचडी करणारे मार्गदर्शक आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तायक्वाँदो हा खेळाचा समावेश शालेय व महाविद्यालयीन शिक्षणामध्ये झाल्यास, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळतील. त्याचप्रमाणे प्रशिक्षकांनाही यामाध्यमातून रोजगाराचे साधन निर्माण होईल. काही वर्षापूर्वी रत्नागिरीतील शाळांमध्ये असा प्रयत्न करण्यात आला होता. खेळात सहभागी खेळाडूंनी जिल्ह्याचे, राज्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचवावे.

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय शालेय तायक्वाँदो स्पर्धेत कास्यपदक विजेत्या पुणे येथील श्रृतिका टकले, जी 1 आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कांस्यपदक विजेती बीडची नयन बारगजे, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती विधी गोरे, अमेय सावंत या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी तायक्वाँदो फेडरेशनये सहसचिव मिलींद पठारे, राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, व्यंकटेश्वरराव कररा यांच्यासह निमेश नायर, राजन शेट्ये, शिल्पा सुर्वे, प्रभारी क्रीडा अधिकारी विशाल बोडके, युवासेनेचे तालुकाधिकारी तुषार साळवी, शहराधिकारी अभिजीत दुडये, संजय नाईक आणि राहूल साळवी आदी उपस्थित होते.

 

युवा सेना पदाधिकार्‍यांची थोपटली पाठ

 

तायक्वाँदो स्पर्धेच्या यशस्वीतेमध्ये मोलाची भुमिका बजावणारे युवासेनेचे शिलेदार तालुकाधिकारी तुषार साळवी यांच्यासह सर्व युवासैनिकांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष कौतुक केले. खेळाडूंच्या राहण्याची, जेवण्यापासूनची सर्व व्यवस्था करण्यापासून स्पर्धेच्या सुरुवातीपासून त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांची पाठ थोपटली.