चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अर्थात एनडीआरएफ पुणे ०५ बटालियन मार्फत टीम कमांडर जी. बी. प्रमोद रॉय यांच्या नेतृत्वाखालील टीम तर्फे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. माधव बापट यांचे हस्ते कमांडर प्रमोद राय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रशिक्षणात एनडीआरएफ पथकाच्या जवानांनी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी घ्यावयाच्या दक्षता, उपाययोजना तात्काळ प्रतिसाद व सुरक्षिततेच्या विविध पद्धतीने बाबत सविस्तर माहिती दिली. रक्तस्त्राव होत असलेल्या व्यक्तीला हाताळणे, जखमी व्यक्तीला हाताळणे, फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तीला हाताळणे, भूकंप -आग आदी प्रसंगी परिस्थिती हाताळणे, लहान व मोठ्या मुलांना सीपीआर व कृत्रिम श्वासोच्छ्वास तसेच डोंगराळ भागात एखादी दुर्घटना घडली व स्थानिक प्रशासन पोहोचण्यापूर्वी बचाव कार्य कसे करायचे? व भविष्यात हे कसे उपयोगी येणार आहे याचे महत्त्व पटवून दिले .जखमींना बँडेज कसे करावे? हात फ्रॅक्चर झाल्यावर कशाप्रकारे बांधावा? पुरातील पाण्याचा पाण्यातून घरातील प्लास्टिक बॉटल, थर्माकोल, नारळ यांचा वापर करून बचाव कसा करावा? याचे विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेण्यात आले. या कार्यक्रमाला उपप्राचार्या प्रा.सौ.स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ.सौ. सुजाता खोत, लेफ्टनंट कॅप्टन नम्रता माने, प्रा. सौ मृण्मयी सोहोनी तसेच इतर सर्व शिक्षक-शिकतेतर कर्मचारी उपस्थित होते.













