चिपळूण (प्रतिनिधी) : गतवर्षी चिपळूण व गुहागर येथे घडलेल्या दोन महत्त्वपूर्ण गुन्ह्यांच्या तपासामध्ये पोलीस मित्र म्हणून मोलाचे सहकार्य करून गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल पोलीस मित्र सचिन नंदकुमार चोरगे यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) राजेंद्रकुमार राजमाने यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी डीवायएसपी राजमाने यांनी “भविष्यात ज्या ज्या वेळी आवश्यकता भासेल, त्या-त्यावेळी आपण अशाच प्रकारे उत्तम कामगिरी बजावत रहाल व पोलीस दलास सहकार्य कराल,” असा विश्वास व्यक्त केला. तर पोलीस मित्र सचिन चोरगे यांनी “पोलीस मित्र” म्हणून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरवाचा क्षण नाही, तर समाजासाठी आणि कायद्याच्या रक्षणासाठी सतत तत्पर राहण्याची प्रेरणाही आहे. गुन्ह्यांच्या तपासात सहकार्य करून पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या प्रत्येक क्षणाने मला सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ केली आहे. डीवायएसपी राजमाने यांनी माझ्या कामावर दाखवलेला विश्वास आणि पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच माझ्या सहकाऱ्यांचे सहकार्य यामुळेच हे शक्य झाले. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. भविष्यात कुठेही, कधीही आवश्यकता भासेल, तिथे पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन आणि समाजहितासाठी माझे योगदान देत राहीन अशा भावना व्यक्त केली. सचिन चोरगे यांचा यापूर्वीही रत्नागिरीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी, गंभीर व गुंतागुंतीच्या एकूण आठ गुन्ह्यांच्या तपासामध्ये पोलीस दलास दिलेल्या सहकार्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून गौरव केला होता. तसेच कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, पोलीस प्रशासनातर्फे तत्कालीन डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या हस्ते त्यांना “कोविड योद्धा” प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. हा सन्मान सचिन चोरगे यांच्या समाजभान, कर्तव्यनिष्ठा आणि पोलीस दलाशी असलेल्या घनिष्ठ सहकार्याचे द्योतक ठरला आहे.













