राष्ट्रध्वजातून प्रतित होते देशाचे सामर्थ्य, सार्वभौमत्व व गौरवशाली इतिहास : संदीप गावडे 

‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत सावंतवाडीत राष्ट्रप्रेमाचा जागर

शहरात आयोजित तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

सावंतवाडी । प्रतिनिधी : कुठल्याही देशाची ओळख ही त्याच्या राष्ट्रध्वजावरून होते आणि आपला तिरंगा भारत देशाचा गौरवशाली इतिहास सांगतो. आपण जरी विविध जाती, धर्म आणि पक्षांमध्ये विभागले गेलो असलो तरी, हा राष्ट्रध्वज आपल्याला एकत्र आणतो. भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि तिरंग्याच्या सन्मानासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे आणि त्यांच्या त्यागामुळेच या राष्ट्रध्वजाचा मान अबाधित आहे.

आपल्या राष्ट्रध्वजातून देशाचे सामर्थ्य, सार्वभौमत्व आणि जागतिक स्तरावरील मान-सन्मान दिसून येतो त्यामुळे आपल्या राष्ट्रध्वजाचा व देशाचा हाच गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा याच उद्देशाने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले,

असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी केले.

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भाजपचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी आयोजित केलेल्या ‘भव्य तिरंगा रॅलीला ‘ सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या जयघोषाने सावंतवाडी शहर दुमदुमून गेले. विविध राजकीय, सामाजिक संघटना, विद्यार्थी, महिला, डॉक्टर, पत्रकार, व्यापारी आणि असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीने देशाबद्दलची एकता आणि अभिमान व्यक्त केला.

संदीप गावडे पूढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जागतिक पातळीवर जो गौरव मिळत आहे आणि पुढील काळात देशाचे जे उज्ज्वल भविष्य आहे, ते सर्व या तिरंग्यातूनच प्रतिबिंबित होते. या तिरंग्याचा मान राखण्यासाठी ज्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले, त्या सर्व भारतीय जवानांची आन बान आणि शान असा हा तिरंगा आहे. तसेच, देशाला आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी बनवणाऱ्या शास्त्रज्ञांचाही तो गौरव आहे. त्यामुळेच हा गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचावा याच उद्देशाने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते व आजची नागरिकांची भव्य अशी उपस्थिती पाहता हा उद्देश निश्चितच सफल झाला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सावंतवाडीतील ऐतिहासिक राजवाड्यांच्या प्रांगणातून या तिरंगा रॅलीचा शुभारंभ झाला. शहरातून फिरून ही रॅली जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे समाप्त झाली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे जेष्ठ पदाधिकारी पुखराज पुरोहित यांनीही तिरंगा रॅलीच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांना संबोधित करीत तिरंग्याचे महत्त्व आणि या अभियानाचा उद्देश स्पष्ट केला तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या तिरंगा यात्रेला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाबँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, हर घर तिरंगा जिल्हा संयोजक संदिप गावडे,सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महिला शहर अध्यक्षा सौ. मोहिनी मडगांवकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर,

यावेळी भाजपचे जेष्ठ पदाधिकारी पुखराज पुरोहित, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ , सांगेली सरपंच लवू भिंगारे, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी शहराध्यक्ष संजू शिरोडकर, सुकन्या टोपले, मिसबा शेख, सिद्धेश तेंडुलकर, जिल्हा कार्यकारी सदस्य चंद्रकांत जाधव, दिलीप भालेकर, प्राध्यापक विकास गोवेकर,अमेय तेंडोलकर नाथा कदम हेमंत खानोलकर, मेघना साळगांवकर, यांच्यासह तालुक्यातील विद्यार्थी , एनसीसी कॅडेट्स, महिला, डॉक्टर, पत्रकार, व्यापारी, तसेच तालुक्यातील असंख्य देशप्रेमी नागरिक यांची उपस्थिती मोठ्या संख्येने दिसून आली. यावेळी सावंतवाडीकरांच्या मनात असलेल्या राष्ट्रप्रेमाची प्रचिती यावेळी दिसून आली.