‘उक्तृष्ट महाविद्यालय’ पुरस्कारासाठी वेंगुर्ले येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठ पडताळणी समितीची भेट

वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला ‘उक्तृष्ट महाविद्यालय’ पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या पडताळणी समितीने भेट दिली. समितीने शैक्षणिक, प्रशासकीय, संशोधन, क्रीडा, सांस्कृतिक, विद्यार्थी कल्याण, सामाजिक बांधिलकी व पायाभूत सुविधा अशा सर्व अंगांनी पाहणी करून आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली.

पडताळणी समितीत प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी (माजी प्र-उपकुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), प्राचार्य डॉ. संजय चकाणे (माजी व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) आणि डॉ. चंद्रकांत एन. रावल (प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे) यांचा समावेश होता. समितीचे आगमन झाल्यावर एनसीसी कॅडेट्सनी संचलन करून मानवंदना दिली. प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर पेट्रन कौन्सिल सदस्य दौलतराव देसाई यांनी मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या विजय चव्हाण व सहकाऱ्यांनी गीत सादर करून स्वागत केले. तर प्राचार्य डॉ. गोस्वामी यांनी महाविद्यालयाचा प्रवास, NAAC ‘A’ ग्रेड (CGPA 3.23), शैक्षणिक-सामाजिक उपक्रम, हरित कॅम्पस, विद्यार्थी प्रगतीची आकडेवारी आणि विशेष कामगिरीचा आढावा सादर केला. विभागप्रमुखांनी आपल्या विभागांच्या शैक्षणिक व संशोधन कार्याची माहिती दिली. समितीने प्रयोगशाळा, संगणक केंद्र, वाचनालय, क्रीडांगण, सांस्कृतिक सभागृह, एनसीसी-एनएसएस विभाग, मुलींसाठी वसतिगृह तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध संधी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, संशोधनातील प्रगती व समाजाभिमुख उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरच्या अध्यक्ष सौ. शिवानी देसाई, चेअरमन सौ. मंजिरी मोरे, सचिव श्री. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल सदस्य श्री. दौलतराव देसाई तसेच प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात अध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले. समितीचा अहवाल लवकरच मुंबई विद्यापीठाकडे सादर होणार असून, त्यानंतर ‘उक्तृष्ट महाविद्यालय’ हा मानाचा दर्जा मिळण्याची अंतिम प्रक्रिया पार पडणार आहे.