वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले शहरात कॅम्प येथील फळ संशोधन केंद्रा कडे मागून जाणारा रस्ता सद्या नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. झाडी झुडपे वाढल्याने हा रस्ता बंद झाल्या सारखाच आहे, तरी तो रस्ता सुरळीत सुरूच करण्याबाबत आपण आमदार दीपक केसरकर आणि पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन देणार असल्याची माहिती वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष परब यांनी दिली.
पर्यटनाबरोबर स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रा सह देशात नंबर १ वर वेंगुर्ला शहर आहे. शहरात अनेक गार्डन्स, स्वच्छ किनारा, झुलता पूल, स्विमिंग पूल सुद्धा आहे. पण कॅम्प येथील स्विमिंग पूल समोरून आणि वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथून जाणारा हा रस्ता वेंगुर्ला शहरासाठी डोकेदुखी झाला आहे. वेंगुल्यातील बरेच नागरिक सकाळी व संध्याकाळी वेंगुर्ला कॅम्प येथे फिरायला जातात परंतु हा रस्ता एवढा घनदाट झालेला असल्यामुळे त्या रस्त्याने जाणे सर्वजण टाळतात. हा रस्ता नगरपालिकेच्या अखत्यारीत नसल्यामुळे नगरपालिका लक्ष देत नाही आणि फळ संशोधन केंद्राला वारंवार सांगून सुद्धा ते या रस्ता सुस्थितीत करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे व साफसफाई पण करत नाही. त्यामुळे वेंगुर्ल्यातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे. हा विषय स्वातंत्र्य दिना दिवशी आमदार दीपक केसरकर व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना वेंगुर्ल्यातील सर्व लोकांना एकत्रित करून निवेदन देणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते संतोष परब यांनी सांगितले













