युवा नेते संदीप गावडे यांचा उपक्रम
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे युवा नेते संदीप गावडे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावंतवाडी येथील कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय (जिल्हा परिषद शाळा क्र. ६) आणि वि. स. खांडेकर महाविद्यालय, भटवाडी येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्याचा उपक्रम राबवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याची व्याप्ती आता वाढली आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे हाच मुख्य उद्देश ठेवून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो, असे संदीप गावडे यांनी यावेळी सांगितले. या वर्षीच्या वह्यांवर देशातील विविध महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची माहिती छापण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी आणि त्यांनी या परीक्षांमध्ये सहभाग घ्यावा अशी गावडे यांची इच्छा आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनाही सहकार्य करण्याची तयारी त्यांनी यावेळी दर्शवली.
या कार्यक्रमाला माजी नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, अनिकेत आसोलकर, ॲड. चैतन्य सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी मदत मिळाली असून, त्यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण होण्यासही मदत झाली आहे.











