राजापूर BREAKING : मीठगवाणे सागरी महामार्गावर भीषण अपघात – सात महिला गंभीर जखमी, एकाचा मृत्यू


जैतापूर | राजन लाड

रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी महामार्ग आज बुधवारी सकाळी भीषण दुर्घटनेने हादरला. मीठगवाणे चिरेखनि स्टॉपच्या पुढे सव्वा नऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात सात महिलांचा गंभीर जखमींमध्ये समावेश असून, त्यापैकी एकीचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वाघ्रण गावातून बागकामासाठी निघालेल्या महिलांचा टेम्पो जानशी पठाराच्या दिशेने जात होता. मात्र, समोरून येणाऱ्या लक्झरी बसला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला आणि क्षणात टेम्पो सुमारे 100 ते 150 फूट रस्त्याच्या कडेला पलटी मारत फरफटत गेला. टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटताना आत बसलेल्या महिला आणि एक छोटी मुलगी गंभीर जखमी झाली. चालक आणि केबिनमधील पुरुष प्रवासीही या जखमी झाले आहेत.

रक्ताने माखलेल्या जखमींना स्थानिक नागरिकांनी वेळ न दवडता जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवले. मात्र अधिक उपचारांसाठी त्यांना तातडीने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. दुर्दैवाने, उपचार सुरू असतानाच एका महिलेचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अवघ्या 15-20 मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी महिलांचे तुटलेले सामान, फुटलेले काचांचे तुकडे आणि रक्ताचे डाग या भीषणतेची साक्ष देत होते. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे, तर अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली.