तुळशी फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठाण्यातल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

खेड (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील तुळशी फाटा येथे आज पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की संबंधित वाहनाचे चाक थेट तरुणीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुरुवातीला तरुणीची ओळख पटत नव्हती. ती काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेली असल्याची माहिती समोर आली होती. स्थानिकांच्या मदतीने व नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर मृत तरुणीची ओळख कु. स्वप्नाली विजय कदम अशी पटली. त्या श्री. विजय लक्ष्मण कदम यांची कन्या असून मूळ राहणार वावे (वाळंजवाडी) तर्फे नातू गाव येथील आहेत. त्यांचे कायम वास्तव्य ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली आहे.

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहाटेच्या सुमारास संबंधित तरुणी महामार्गावर कशासाठी होती, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काही स्थानिकांकडून संबंधित तरुणीच्या मानसिक स्थितीबाबत चर्चा होत असल्याचेही समोर येत आहे; मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिस तपासानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवला असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संबंधित वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे खेड तालुक्यात शोककळा पसरली असून मृत तरुणीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.