अनुदानापेक्षा शाश्वत विकासाकडे लक्ष्य निर्णायक : डॉ संदीप संसारे

चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणात भातशेतीला केंद्रीभूत ठेवून अनेक शेतकरी आपले पशुधन त्या पिकाच्या हंगामाला गोठ्यात ठेवतात बाकीच्यावेळी त्यांच्यासाठी आपली जबाबदारी कोणती आहे? याकडे दुर्लक्ष होते. जनावरांचे संभाव्य आजारांची लस आणि तीन महिन्यातून एकदा आवश्यक जंताचे औषध शासनाकडून विनामूल्य मिळते, तिथेही शेतकरी उदासीन असतो. शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी आवश्यक दाखल्याची तयारी आपण करत नाही म्हणून जागृत व्यक्ती संधीचा लाभ घेतात. अनुदान लक्ष्य न करता त्याकडे शासनाचे शाश्वत विकासासाठी पाठबळ म्हणून पहावे, आपला शाश्वत विकास हेच अंतिम ध्येय असायला हवे असे मौलिक मार्गदर्शन पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ .संदीप संसारे यांनी कोळकेवाडी येथे केले.
स्व गोपाळराव रामचंद्र शिंदे प्रतिष्ठान आयोजित कृषी व ग्रामविकास शेतकरी मेळाव्यात पाच वक्त्यांनी विविधांगी मार्गदर्शन केले. चिपळूण तालुका पशुसंवर्धन अधिकारी विनया जंगले यांनी शासनाच्या पस्तीस योजना शेतकरी विकासासाठी असून शेतकऱ्यांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. आपल्या जंगलातील औषधी वनस्पती जनावरे व आपणास कसे उपयुक्त आहेत त्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा घेण्यास सूचित केले. दूधवाढ होण्यासाठी शतावरी वनस्पती मौलिक असल्याचेही स्पष्ट केले. घरडा फोऊन्डेशन तुषार हळदवणेकर यांनी कंपनीच्या कुकुट्ट पालन योजनेची पूर्ण माहिती दिली.पोलिस निरीक्षक प्रशांत आवारे,निवृत्त कृषी अधिकारी विनोद शिंदे यांचेही मनोगत सर्वांना भावले. प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ कृपाल शिंदे, दिलीप शिंदे,दीपक शिंदे,रवींद्र शिंदे, रणजीत शिंदे यांनी मेळाव्याचे आयोजन केले. सूत्रसंचलन प्रीतम शिंदे, आभार श्रुतिका शिंदे यांनी मानले. पंचक्रोशीतील अनेकांनी उपक्रमाचे कौतुक केले.