आरवली येथे कै. जयवंत दळवी जन्मशताब्दी सोहळ्याची यशस्वी सांगता
सावंतवाडी । प्रतिनिधी : प्रख्यात साहित्यिक कै. जयवंत दळवी यांचे साहित्य चिरंजीव असल्यामुळे ते कधीही कालबाह्य होणार नाही. त्यांचे साहित्य हेच त्यांची खरी संजीवन समाधी आहे, असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष आणि नामवंत वक्ते प्राचार्य अनिल सामंत यांनी केले. आरवली येथे आयोजित करण्यात आलेल्या कै. जयवंत दळवी जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात ते बोलत होते.
हा सोहळा दळवींच्या जन्मगावी, आजगाव येथील ‘साहित्य प्रेरणा कट्टा’, ‘रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालय’ आणि दळवी कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला दळवींचे सुपुत्र गिरीश दळवी, ‘संगीत देवबाभळी’ नाटकाचे लेखक व दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, आणि प्राचार्य अनिल सामंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
दळवींच्या जीवनावर आणि साहित्यावर आधारित विविध कार्यक्रमांचे सादरीकरण या सोहळ्यात करण्यात आले. राजेश नाईक यांनी तयार केलेला ‘पाऊलखुणा’ हा विशेष कार्यक्रम दृकश्राव्य पद्धतीने सादर करण्यात आला, ज्यात दळवींच्या साहित्यात उल्लेख असलेल्या त्यांच्या घरातील वस्तू आणि आरवली परिसरातील वास्तूंचा मागोवा घेण्यात आला.
विनय सौदागर दिग्दर्शित ‘दळवींचे साहित्य चरित्र’ या कार्यक्रमात उमा प्रभुदेसाई (गोवा), नीला इनामदार (अमेरिका), आणि स्थानिक कलाकार रवींद्र पणशीकर यांनी दळवींच्या नाटकातील व्यक्तिरेखा सादर केल्या. ‘आप्तेष्टांशी हितगुज’ या सत्रात गिरीश दळवी आणि त्यांच्या पत्नी आदिती दळवी यांची मुलाखत घेण्यात आली, ज्यात दळवींचे वडील आणि सासरे म्हणून असणारे व्यक्तिमत्त्व उलगडले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन गोव्यातील साहित्यिक सोनाली परब यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सचिन गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सोहळ्याला दळवींचे कुटुंबीय तसेच गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक चाहते उपस्थित होते.













