आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे थाटात उद्घाटन
बक्षिसांचा वर्षाव असलेल्या स्पर्धेला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण | प्रतिनिधी : नारळी पौर्णिमेनिमित्त शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या महिला नारळ लढविणे स्पर्धेने उत्साहाचे वातावरण निर्माण केले. बक्षिसांचा वर्षाव असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. स्पर्धेला महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला क्रीडा आणि मनोरंजनाची जोड देत महायुतीच्या वतीने यंदा ही स्पर्धा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी आमदार निलेश राणे यांनी स्पर्धेचे विशेष कौतुक केले. महायुतीच्या माध्यमातून मालवण-कुडाळ मतदारसंघात सण-उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम यापुढेही अशाच उत्साहात व भव्य स्वरूपात साजरे केले जातील, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रक्षाबंधनाच्या महिला भगिनींना शुभेच्छाही दिल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी यावेळी आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा गौरव केला. आमदार राणे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खेचून आणला असून, मतदारसंघात गतिमान पद्धतीने विकासकामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्षा ममता वराडकर यांनीही आमदार निलेश राणे यांच्या विकासात्मक कार्याचा आढावा घेतला. तसेच मालवणच्या नारळी पौर्णिमा उत्सवाची परंपरा आणि महिला नारळ लढविणे स्पर्धेचे महत्त्व याबाबत माहिती दिली.
बक्षिसांचा भरघोस वर्षाव
महिला स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी महायुतीच्या वतीने आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेस सोन्याची नथ, मानाची पैठणी आणि फ्रिज, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांकासाठी चांदीचा कुंकवाचा करंडा, चतुर्थ क्रमांकासाठी चांदीचा छल्ला, तर पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी मिक्सर अशी बक्षिसांची आकर्षक रेलचेल होती. बक्षिसांची भव्यता आणि स्पर्धेतील चुरस यामुळे महिला स्पर्धकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. सायंकाळी उशिरापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी मालवण बंदर जेटीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सभापती प्रज्ञा चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, मंदार लुदबे, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शिवसेना मालवण-कुडाळ संघटक तथा स्वच्छता आरोग्य सभापती पूनम चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष तथा महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, स्वप्नाली नेरुरकर, नगरसेविका मेघा सावंत, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, अश्विनी कांदळकर, ललित चव्हाण, अर्चना मिठबावकर, तारका चव्हाण, महिमा मयेकर, अमृता फाटक, अर्चना सामंत, गांवकर, शाम वाक्कर, राजू बिडये, मनोज हडकर, मिलिंद झाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
महायुतीच्या वतीने आयोजित या महिला नारळ लढविणे स्पर्धेला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक नारळी पौर्णिमा उत्सवात महिलांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. स्पर्धेतील प्रत्येक फेरीत वाढत जाणारी चुरस आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे बंदर जेटीवर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
मालवण बंदर जेटी येथे महायुतीच्या वतीने आयोजित महिला नारळ लढविणे स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी आमदार निलेश राणे यांचा सत्कार करताना शिवसेना भाजप महायुतीच्या महिला पदाधिकारी.
मालवण बंदर जेटी येथे महायुतीच्या वतीने आयोजित महिला नारळ लढविणे स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी नगराध्यक्ष ममता वराडकर व शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांनी नारळ लढवून शुभारंभ केला. (अमित खोत, मालवण)














