रत्नागिरी नगर पालिकेमधील 55 स्वच्छता कर्मचारी आणि 5 कचरा वाहतुकीच्या गाड्या झाल्या कमी

शहरातील कचरा उचलण्यावर होतोय परिणाम

रत्नागिरी :
रत्नागिरी नगर पालिकेमध्ये गेली अनेक वर्ष ठेकेदारी पध्दतीने काम करणारे 55 कर्मचारी आणि पाच कचरा वाहतुकीच्या गाड्या कमी केल्यामुळे कचरा उचलण्यास आणि वाहतुकीला मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शहरवासियांमध्ये नाराजीचा सूर असून याबाबत नगर पालिकेने तातडीने कार्यवाही करावी लोकांना त्रास होता कामा नये अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी न.प. अधिकार्‍यांना दिल्या.
काही दिवसांपूर्वी नगर पालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी गेली अनेक वर्ष ठेकेदारी पध्दतीने काम करणार्‍या 55 कामगारांना कमी करण्यात आले आणि पाच गाड्याही बंद करण्यात आल्या. त्यामुळे आहे त्याच कर्मचार्‍यांमध्ये साफसफाई करणे आणि कचरा उचलणे आदी कामांना वेळ लागू लागला. बाजारपेठेतील कचरा तर रात्री उशिरा उचलण्यात येत असे, त्यामुळे व्यापार्‍यांनाही रात्री उशिरापर्यंत थांबून रहावे लागत असे. प्रत्येक वॉर्डमध्येही कचर्‍याच्या गाडया फिरवतानाही वेळेत बदल झाले होते. अनेक ठिकाणी दीड-दोन तास उशिराने गाड्या जात होत्या. त्यामुळे नोकरदार वर्गाचेही कचरा टाकताना हाल होऊ लागले होते. त्यामुळे नगर परिषद आरोग्य विभागाच्या या धोरणाबद्दल नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख राहूल पंडीत, शहरप्रमुख बिपीन बंदरकर व माजी नगरसेवकांनी लोकांच्या या भावना पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर घातल्या. त्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी नगर पालिका अधिकारी आणि आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकार्‍यांना बोलावून घेतले. कमी केलेले 55 कर्मचारी आणि गाड्यांविषयी सोमवारी बैठक घेऊन निर्णय घ्यावा अशा सूचना केल्या. त्यामुळे शहरातील कचरा प्रश्नाबाबत सोमवारी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.