शहरातील नगरपंचायत संकुलाच्या समोर शहर शिवसेना तर दापोली फाटा येथे युवासेना, भाजपच्या माध्यमातून दहीहंडी ; गोविंदांचे उंच उंच मनोरे याच बरोबर करमणुकीचे कार्यक्रम ठरले आकर्षण.
मंडणगड : प्रतिनिधी, -कृष्णाजन्माष्टमी गोपाळकाला दहीहंडीचा उत्सव 16 ऑगस्ट 2025 रोजी तालुक्यात मोठ्या उत्सवात पार पडला. पारंपारीक गोविंदावर भर असलेल्या मंडणगड तालुक्यात गावागावातील गोविंदानी वाडीकोंडावर तीन ते पाच लहान लहान दहीहंड्या फोडण्यावर भर दिला तर शहरात सहा ते सात थरांचा थरार पाहायला मिळाला.
शहरातील बाजारपेठ नगरपंचायत संकुलाच्या समोर शहर शिवसेनेच्या माध्यमातून दहीहंडीचे नियोजन करण्यात आले होते. शहरप्रमुख विनोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली या दहीहंडीचे नियोजन करण्यात आले होते. मंडणगड तालुक्यासह नजीकच्या तालुक्यातील गोविंदा पथके या कार्यक्रमास उपस्थित होते. येथे गोविंदांच्या उंच उंच मनोरयांबरोबर विविध लावणी, ऑर्केस्ट्राचे करमणुकीचे कार्यक्रम शहरवासियांचे आकर्षण ठरले. तर दापोली फाटा समर्थ नगर येथे युवा सेनेच्या माध्यमातून दहीहंडीचे नियोजन करण्यात आले होते. याचबरोबर भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातूनही दापोली फाटा येथे दहीहंडीचे नियोजन करण्यात आले होते. उंच थरांची दहीहंडी हे दापोली फाट्यावरील दहीहंड्या हे आकर्षण ठरले. युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य चेतन सातोपे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहर व भिंगळोली या ठिकाणच्या या मोठ्या दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातील गोविंदा प्रेमींनी गोविंदना प्रोत्साहन देण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरवर्षी प्रमाणे तालुक्यातील देव्हारे येथील शिवसेनेची दहीहंडी तालुकवासियांचे आकर्षण ठरले. तालुकाध्यक्ष प्रताप घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या देव्हारे येथील दहीहंडीला येथील पंचक्रोशीतील गोविंदांनी हजेरी लावली.
तालुक्यात एकूण 4 सार्वजनीक व 853 दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची उपस्थिती –
देव्हारे, मंडणगड शहर, भिंगळोली दापोली फाटा यांच्यासह तालुक्यातील अन्य दहीहंडी कार्यक्रमाला गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी उपस्थित राहुल गोविंदाना प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांनी कृष्णाजन्माष्टमी गोपाळकाला दहीहंडी उत्सवाच्या तालुकवासियांना शुभेच्छा दिल्या.












