BREAKING: खेड-दापोली मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार, मुलगी गंभीर जखमी

खेड (प्रतिनिधी) : खेड-दापोली मार्गावर गुरुवारी सायंकाळी फुरूस इथे भीषण अपघात घडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फुरूस येथील रहिवासी सचिन खामकर हे आपल्या मुलीसह ऍक्टिवा दुचाकीवरून खेडहून फुरूसकडे जात असताना सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सचिन खामकर यांच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याचे चर्चिले जात होते. ही धडक इतकी भीषण होती की सचिन खामकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलीस उशिरा दाखल झाल्यामुळे नागरिकांनी काही काळ रास्ता रोको केल्याचे देखील समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला असून एका संशयित वाहनाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे फुरूस परिसरात शोककळा पसरली आहे.