सावंतवाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पडझड

घरांच्या भिंती कोसळल्या : मांगरही जमीनदोस्त

लाखो रुपयांचे नुकसान : गेळे गावात पुरामुळे संपर्क तुटला

नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरे तसेच शेतमांगराच्या भिंती कोसळून शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर
सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जनजीवन विस्कळीत आणि वाहतूक ठप्प
या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इतका जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक सखल भागातील पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तळवडे गावाच्या सीमेवरील होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली होती. ग्रामीण भागातील अनेक रस्तेही पाण्याखाली गेल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तेरेखोल नदी धोका पातळीच्या जवळ
तालुक्यातून वाहणारी तेरेखोल नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या या नदीने ४ मीटर एवढी पाणी पातळी गाठली असून, धोका पातळी ६ .२६० मीटर आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नदी कधीही धोका पातळी गाठू शकते, अशी शक्यता आपत्कालीन विभागाने वर्तवली आहे त्यामुळे प्रशासनाने संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी रणनीती आखली आहे.

मोठ्या प्रमाणात पडझड : लाखोंचे नुकसान
या अतिवृष्टीमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. अनेक घरांच्या भिंती कोसळल्या असून, शेतीचेही नुकसान झाले आहे.
कास, पंडितवाडी येथील नामदेव परशुराम पंडित यांच्या घराची मांगर आणि भिंत कोसळून सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
माडभाकरवाडी येथील संतोष रामराव कुलकर्णी यांच्या घराची पडवी आणि छत कोसळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर
साटेली तर्फे सातार्डा येथील धोंडू बाबली शेंडेकर यांच्या घराच्या भिंती कोसळून सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच माजगाव येथील रविकांत भिकाजी मांजरेकर यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याव्यतिरिक्त, संततधार पावसामुळे नदीकाठच्या काही भागातील भातशेती पाण्याखाली गेली असून, त्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच, तालुक्यात वीजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. विशेषतः गणेश चतुर्थी तोंडावर आल्याने गणेश मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना याचा मोठा फटका बसत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्यांच्या कामात व्यत्यय येत असून, त्यांनी वीज वितरण कंपनीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यात येत असून, बाधित कुटुंबांना मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, आंबोली घाट मार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.