दापोली तालुक्याचे सुपुत्र डॉ. अमित अरुण बैकर यांचे आंतरराष्ट्रीय यश

दापोली :
दापोली तालुक्याचे सुपुत्र डॉ. अमित अरुण बैकर यांनी आपल्या कार्यकौशल्य आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजणारे यश संपादन केले आहे. अमेरिकेतील अटलांटा कॉलेज ऑफ लिबरल आर्ट्स अँड सायन्सेस या नामांकित संस्थेतून त्यांनी डॉक्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (DBA) ही प्रतिष्ठेची पदवी मिळवली आहे.

साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या डॉ. बैकर यांनी मर्यादित सुविधा, आर्थिक चणचण आणि शैक्षणिक स्पर्धा यांचा सामना करत जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. “शिक्षण आणि ज्ञानाची भूक हीच माझ्या उर्जेचे खरे स्रोत होते,” असे ते सांगतात.

त्यांच्या या यशामुळे आई-वडिलांचा अभिमान शिगेला पोहोचला असून, कुटुंबीयांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबरोबरच डॉ. बैकर यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यामध्ये –यंग प्रोफेशनल अवॉर्ड, डॉ. एच. एस. पृथी अवॉर्ड, बेस्ट अकॅडेमिशियन अवॉर्ड, सायंटिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड, गोल्ड मेडल अवॉर्ड या पुरस्कारांमधून त्यांच्या संशोधनवृत्तीची, कार्यक्षमतेची आणि सामाजिक जाणिवेची दखल घेण्यात आली आहे.

समाजाशी नाळ जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. बैकर यांनी आपले ज्ञान समाजाच्या उन्नतीसाठी वापरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थी जर योग्य मार्गदर्शन, संधी आणि आत्मविश्वास मिळवला तर ते जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आगामी काळात संशोधन, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि तरुणांसाठी मार्गदर्शन या माध्यमातून समाजाला योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे.”प्रत्येक तरुणाने आपले स्वप्न धाडसाने पेलले पाहिजे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनतीसमोर ती क्षुल्लक ठरते,” असा संदेश डॉ. बैकर यांनी दिला.