मुंबई : देवगड येथील सर्पमित्र व सामाजिक कार्यकर्ते पप्पू उर्फ सुरेश सदानंद कदम यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन नुकताच गौरविण्यात आला.
हा पुरस्कार जनजागृती सेवा संस्था, ठाणे यांच्या वतीने कणकवली येथे प्रदान करण्यात आला. कदम यांनी सर्पमित्र म्हणून उल्लेखनीय कार्य केले असून, अनेक प्राण्यांचे प्राण वाचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सामाजिक क्षेत्रातील कार्य आणि सर्पमित्र म्हणून केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, सचिव संचिता भंडारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या सन्मानाबद्दल पप्पू कदम यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.












