राकेश कोळी, खेड (जि. रत्नागिरी) —
शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या मातोश्री लिलाबाई गंगाराम कदम यांच्या निधनाने संपूर्ण खेड तालुका शोकसागरात बुडाला आहे. मात्र या अपार दुःखातूनही आईने दिलेल्या संस्कारांची, प्रेमाची आणि आशीर्वादाची शिदोरी सोबत घेऊन कदम कुटुंबीय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याची ठाम भावना रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या शब्दांनी केवळ कुटुंबीयांनाच नव्हे तर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनाही नवसंजीवनी दिली आहे.
सोमवारी, 8 डिसेंबर रोजी रात्री जामगे (ता. खेड) येथील निवासस्थानी शंभर वर्षांहून अधिक आयुष्य जगलेल्या लिलाबाई गंगाराम कदम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ एक कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण खेड तालुक्याने आपली माऊली गमावली आहे. मंडणगड तालुक्यातील पालवणी हे त्यांचे मूळ गाव. विवाहानंतर त्या जामगे येथे स्थायिक झाल्या आणि तेथीलच मातीशी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जोडले. शांत, स्थिर, धार्मिक, कष्टाळू आणि साधेपणाने आयुष्य जगणाऱ्या लिलाबाई कदम या संघर्ष आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. त्यांचे पती गंगाराम कदम यांचे 1983 साली निधन झाले. त्या वेळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र खचून न जाता त्यांनी आई आणि वडिलांची दोन्ही भूमिका समर्थपणे निभावत पाच मुलगे आणि एक मुलगी अशा सहा अपत्यांचे संगोपन केले. लहानांचे मोठे करताना त्यांनी त्यांना केवळ माया दिली नाही, तर जीवनात टिकून राहण्यासाठी लागणारी जिद्द, कष्ट आणि स्वाभिमानाची शिकवणही दिली. घरची वडिलोपार्जित शेती स्वतःच्या कष्टाने कसत भात, नाचणी, पावटा यांसारखी पिके पिकवून त्यांनी कुटुंबाचा गाडा चालवला. संकटांपुढे न झुकता त्यांनी आपल्या मुलांमध्ये संस्कार, आदर, मेहनत आणि माणुसकीचे मूल्य रुजवले. त्यांच्या संस्कारातून घडलेली ही पिढी आज विविध क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
त्यांच्या पाच मुलांपैकी विजय कदम यांनी उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवला. दुसरे पुत्र रामदास कदम यांनी राज्याच्या राजकारणात भक्कम पाय रोवून शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून ओळख निर्माण केली. सदानंद कदम हे यशस्वी उद्योजक असून केबल व इंटरनेट व्यवसायात कार्यरत आहेत. शिवाजी कदम शेती व्यवसायात कार्यरत आहेत, तर अरुण उर्फ चंद्रकांत कदम यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीत विविध पदांवर काम करत सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली. एका मुलीसह सहा अपत्यांचे संगोपन लिलाबाईंनी मायेने केले आणि प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली.
रामदास bhai कदम यांनी 1985 साली खेड तालुक्यातून राजकीय वाटचाल सुरू केली. त्या काळात तालुक्यात गावोगावी शाखा उभारणे, संघटना वाढवणे आणि शिवसेनेचा विचार तळागाळात पोहोचवण्याचे काम सुरू असताना, जामगे येथील कदम यांचे घर हे कार्यकर्त्यांसाठी जणू आपलेच घर बनले. या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चहा-पाणी, नाश्ता आणि जेवण केल्याशिवाय परत पाठवले जात नसे. ‘अन्नदान हे श्रेष्ठदान’ या उक्तीचा अर्थ लिलाबाई कदम यांनी आपल्या आयुष्यातून जगाला दाखवून दिला. गेली चार दशके ही परंपरा अखंड सुरू होती आणि आजही जामगे येथे येणारा माणूस रिकाम्या पोटी परत जात नाही, अशी भावना तालुक्यातील नागरिक अभिमानाने व्यक्त करतात. तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकीत यश मिळाल्यानंतर सर्वप्रथम या माऊलीचा आशीर्वाद घेण्यासाठी जामगे येथील घरी येत. अनेक वेळा महिला लोकप्रतिनिधी या आईसोबत स्वयंपाकघरात उभ्या राहून तिला मदत करत. त्यांच्या प्रेमळ पाहुणचारामुळेच जामगे येथील कदम यांचे घर हे तालुक्यातील प्रत्येकासाठी माहेरघर बनले होते. कुटुंबातीलच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक माणूस आपलासा वाटावा, हीच लिलाबाईंची आयुष्यभराची शिकवण होती.
त्यांच्या संस्कारांचा प्रभाव पुढील पिढीतही स्पष्टपणे दिसून येतो. गृहराज्यमंत्री योगेश कदम, सिद्धेश कदम, शैलेश कदम आणि अनिकेत कदम यांच्यासह संपूर्ण कुटुंब आज राजकारण, समाजसेवा, उद्योग आणि विविध क्षेत्रांत आपापली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहे. हीच लिलाबाई कदम यांच्या आयुष्याची खरी कमाई असल्याची भावना कुटुंबीय आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
या दुःखप्रसंगी भावना व्यक्त करताना रामदास कदम म्हणाले, “माझ्या राजकीय जडणघडणीत जितका वाटा शिवसेना प्रमुखांचा आहे, तितकाच वाटा माझ्या आईचा आहे. वडिलांच्या निधनानंतर तिनेच आम्हाला आई आणि वडील दोन्ही बनून घडवले. तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला कुटुंबाशी जोडून ठेवण्याची शिकवण तिनेच दिली. राजकारणात मिळालेले यश, पदे आणि मान-सन्मान हे शिवसेना प्रमुख तसेच आई-वडिलांच्या आशीर्वादानेच मिळाले. ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ या म्हणीप्रमाणे आज आम्ही पोरके झालो असलो, तरी आईच्या आशीर्वादाची शिदोरी आमच्यासोबत आहे.” आईचे छत्र हरपले असले तरी तिच्या आशीर्वादानेच आपण आणि आपली पुढील पिढी जनतेच्या सेवेत अधिक जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “आईने दिलेले संस्कार, कष्टाची शिकवण आणि माणुसकीचा वारसा घेऊन आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होणार आहोत. जनतेची सेवा हीच आईला खरी श्रद्धांजली ठरेल,” असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले.
आदर्श मातृत्त्व, त्याग, सेवा, कष्ट आणि आपुलकीचे प्रतीक असलेल्या लिलाबाई गंगाराम कदम यांच्या जाण्याने खेड तालुक्याने एक माऊली गमावली आहे. मात्र त्यांच्या संस्कारांची शिदोरी, अन्नदानाची परंपरा आणि माणुसकीचा वारसा कायम जिवंत राहणार आहे. त्याच बळावर कदम कुटुंबीय नव्या जोमाने पुढे वाटचाल करत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार, अशी भावना आज संपूर्ण तालुक्यातून व्यक्त होत आहे.











