मृग नक्षत्र कोरडे गेल्याने यावर्षी भात लावणीच्या कामांना होणार उशीर

तरणा आणि म्हातारा नक्षत्रातील पडणाऱ्या पावसावर लावणी अवलंबून

संतोष कुळे l चिपळूण :मृग नक्षत्राच्या आधी शेतकऱ्यांनी दरवर्षाप्रमाणे पेरणी केली. मात्र पेरणी करून वीस दिवसांचा कालावधी झाला तरीही पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतातुर झाले होते . परंतु मृग नक्षत्र ८ जून रोजी सुरू झाले या नक्षत्राचे वाहन हत्ती असल्याने पाऊस पडेल असा अंदाज वर्तुवला जात होता मात्र ते संपूर्ण नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणी केलेला धान्याला अंकुर फुटले नाहीत. मात्र 22 जून रोजी सुरू झालेल्या आद्रा नक्षत्राने पावसाला सुरुवात झाली. यंदा पेरलेल्या धान्याचे वापसे उशिरा रुजल्यामुळे लावणीचा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

 

दरवर्षी जुन मध्ये सात किंवा आठ तारखेला सुरू होणाऱ्या मृग नक्षत्रा नुसार पाऊस पडण्याचे भाकीत वर्तवली जाते. यावर्षी आठ जून रोजी मृग नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन हत्ती होते. हत्ती वाहन म्हटला की जोरदार पाऊस पडतो अशी पूर्वीपासूनच जुन्या लोकांची धरणा असते. हत्ती, म्हैस, मोर व बेडूक अशी ज्यावेळी नक्षत्राची वाहन असतात तेव्हा जोरदार पाऊस पडणार असे पूर्वीचे जुने जाणते लोक सांगायचे आणि ते खरेही होते. पाऊस पडताना जर पाण्याला जास्त बुडबुडे यायला लागले की, शेतकरी बोलायचे पावसचा जोर वाढणार. त्यांना अंदाज बरोबर असायचा. मात्र आता अंदाज चुकीचे ठरतात. यावर्षी मृग नक्षत्र ८ जूनला सुरू झाले. वाहन हत्ती होते. पण पंधरा दिवस पाऊस न पडल्यामुळे हे नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. परिणामी पेरणी केलेली वाया जाणार का असा संभ्रम निर्माण बळीराजामध्ये झाला होता. वाफसे सुध्दा पाऊस न पडल्याने रुजले नव्हते. पंधरा दिवस वाया गेल्याने शेतीच्या कामे सुद्धा मंदावली . परंतु 22 जून रोजी सुरू झालेल्या आद्रा नक्षत्राने पावसाची सुरुवात झाली. दिवसातून पावसाच्या सरी बरसत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, पेरणी केलेल्या धान्याची अजूनही पाहिजे तशी वाढ न झाल्यामुळे यावर्षी लावणीचा हंगाम निश्चितच उशिरा सुरू होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे.

शेतकरी आता फोडीच्या कामाला लागला आहे. आद्रा नक्षत्राचे वाहन मेंढा आहे. मेंढा वाहन असेल तर पाऊस कमी पडतो असे बोलले जात असे. मात्र, आता नक्षत्र आणि त्यांची वाहने यावर काहीच अवलंबून राहिलेले नाही. कारण पर्यावरणाचा समतोलच ढासळत असल्यामुळे निश्चितच या सर्व गोष्टी घडत आहेत.

पाऊस मृग नक्षत्रात पडला असता तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावणीच्या कामाला कदाचित प्रारंभ झाला असता. पुढे ६ जुलै रोजी पुनर्वसू म्हणजे तरणा पाऊस हे नक्षत्र सुरू होणार आहे. त्याचे वाहन गाढव आहे. त्यानंतर दि. 20 जुलैला म्हातारा पाऊस नक्षत्र सुरू होईल. त्याचे वाहन बेडूक आहे. जर या नक्षत्रामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस पडला तर निश्चितच लावणीच्या कामाला वेग येईल. लावणीच्या कामाला चांगल्या पद्धतीने सुरुवात होईल आणि शेतकरी लावणीतून लवकर मोकळा होऊ शकतो. मात्र हे सर्व पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. पूर्वी नक्षत्र आणि वाहनानुसार पाऊस बरसत असे. रत्नागिरी जिल्ह्यात आता शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. तर काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने आजही शेती करतात. पावसावर अवलंबून राहून शेती करावे लागते. त्यामुळे पाऊस यावर्षी उशीरा सुरू झाल्याने लावणीचा हंगाम उशीरा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.