रत्नागिरी :
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. कोकण आयुक्तांकडे हरकतींवर झालेल्या सुनावणीमध्ये 50 पैकी 11 हरकती मान्य करण्यात आल्या असून उर्वरीत हरकती फेटाळत अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे.
नव्या प्रभाग रचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेचा एक तर पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे 56 तर पंचायत समितीचे 112 गण झाले आहेत. नवीन गण आणि गट रचनेबाबत एकूण 50 हरकती जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. यातील 35 हरकती या गणांच्या बदलेल्या नावावरुन होत्या. तर काही हरकती या गण रचनेमध्ये गावांच्या आदलाबदलीवरुन होत्या. यातील 11 हरकती कोकण आयुक्तांनी मान्य केल्या आहेत. तर 39 हरकती फेटाळून लावत अंतिम प्रभाग रचनेला मंजूर दिली असून, ही प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल लवकरच राज्य निवडणूक आयुक्तांना पाठवला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.










