भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की राजकारणाच्या पलिकडे जाऊन दिवसाचे १८ तास केवळ महाराष्ट्र आणि प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी जे आवश्यक गरजेचे आहे ते घडवण्याचा प्रयत्न करतो अशा लाखमोलाच्या भावाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनोखी भेट द्यायला हवी या विचाराने हा राखी प्रदान सोहळा आखला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ३६ लाख ७८ हजार राख्या राज्यभरातून आल्या. महाराष्ट्राला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी देवाभाऊंनी अविरत केलेले काम सर्वापर्यंत त्यांच्या भगीनींनी पोहोचवायला हवे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
यावेळी आ. चित्रा वाघ म्हणाल्या की देवाभाऊंच्या संकल्पनेनुसार महिलांच्या हाताला काम मिळून दाम मिळावे यासाठी महिला सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या. हा देवाभाऊ लाडक्या बहिणींच्या भल्यासाठी नेहमी झटत असतो. असा भाऊ मिळणे म्हणजे भाग्य आहे. यशवंत, किर्तीवंत व्हा या शुभेच्छा त्यांनी दिल्या. जो निर्णय देवाभाऊ घेतील तो निर्णय तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महिला मोर्चाची आहे अशी ग्वाहीही दिली.
यावेळी शेलार म्हणाले की, हा मेळावा भावनिक आणि नाते जपणारा कार्यक्रम आहे. लाडक्या बहिणींची सदैव काळजी करणारा देवाभाऊ आणि त्यांच्या बहिणींचे नाते अनोखे आहे. मुंबई, मराठी वरून राजकारण करणारे आणि देवाभाऊ यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून राजकारण करणारी मंडळी आज भावाभावाचे नाते जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक घरातील बहीणीला मतदार म्हणून नाही तर बहीण म्हणून बघणारा भाजपा आहे. त्या बहीणींच्या हितासाठी अनेक योजना केंद्र आणि राज्य स्तरावर आज आखल्या जात आहेत.
बहीणींच्या आशीर्वादाने २०२९ साली ही आमचेच सरकार येणार
बहिणींच्या प्रेमाचे आशीर्वाद मिळाले म्हणूनच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊन तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मला लाभली असे नमूद करीत फडणवीस यांनी बहिणींच्या आशीर्वादाने २०२९ मध्येही आमचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. येणाऱ्या काळात महायुती सरकार महिला सहकारी संस्थांसाठी डेडीकेटेड काम मिळायलाच हवे यासाठी त्यांना हिस्सेदारी व हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.












