खेड : प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असताना मुंबई–गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील वेरळ, आवाशी आणि परशुराम घाट या भागात भीषण वाहतूक कोंडीची समस्या उभी राहिली आहे. या मार्गावरील अपूर्ण कामे, खड्डे, तुटलेल्या पट्ट्या आणि एकेरी रस्त्यावरून सुरू असलेली वाहतूक यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

वेरळ आणि आवाशी येथे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत पुलांचे काम सुरू असून ते अद्याप पूर्णत्वाला गेलेले नाही. परिणामी, एकाच लेनवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे. यामुळे वाहनचालकांना तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे. परशुराम घाटात संरक्षक भिंत कमकुवत झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक एकेरी रस्त्यावरून वळवली जात आहे. या ठिकाणी रविवारी सकाळपासूनच प्रचंड कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी वा वाहतूक पोलीस याठिकाणी उपस्थित नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत असल्याने महामार्गावर गर्दी उसळली आहे. अनेक भाविक मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी रवाना झाले असून खड्डेमय रस्ते, चिखल, पावसामुळे साचलेले पाणी आणि अर्धवट कामामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खेड तालुक्याच्या हद्दीत चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी कशेडी ते परशुराम घाट या ४४ किलोमीटर अंतरात भर पावसात काम सुरू असल्याने परिस्थिती गंभीर आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप फडकले यांनी प्रशासनावर टीका करत “वाहतूक कोंडीमुळे अपघात झाल्यास जबाबदारी प्रशासनाचीच असेल” असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी वाहनचालकांना आवाहन केले की, वेरळ, आवाशी आणि परशुराम घाट या ठिकाणी काम सुरू असल्याने वाहन सावकाश चालवावीत आणि लेनची शिस्त पाळावी, अन्यथा दुर्घटनांची शक्यता वाढू शकते.
आवाशी नजीक एकाच लेनवरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू असल्याने झालेली वाहतूक कोंडी
परशुराम घाटात एकेरी मार्गावरून सुरू असलेल्या वाहतुकीमुळे लागलेल्या लांबच लांब वाहनांच्या रांगा












