भोस्ते घाटात ट्रक बंद पडल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी

खेड (प्रतिनिधी) :
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात अचानक एका ट्रकला तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रक घाटाच्या चढावरच बंद पडला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनांची लांबच लांब रांग लागली असून परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक प्रशासन आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रक बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, वाहतुकीसाठी घाटामध्ये सध्या एकेरी मार्गाने वाहनांना सोडण्यात येत असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

या अचानक झालेल्या कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत असून अनेक वाहनचालक घाटातच अडकून पडले आहेत.