ऐन गणेशोत्सवात ओणी पाचल मार्गावर मोठी कारवाई
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवंश वाहतूक आणि कत्तली संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक, श्री. बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या.
या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक लांजा उपविभागात गस्त घालत असताना, त्यांना ओणी ते पाचल मार्गावरील अणुस्कुरा घाटातून गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार, 29/08/2025 रोजी पहाटे 3:30 वाजता रायपाटण येथे पथकाने तपासणी नाका लावला.
पहाटे 5:55 वाजता पथकाने दोन वाहने थांबवली – एक महिंद्रा जिनीओ (MH-04-FP-6424) आणि दुसरी आयशर प्रो-1059 (MH-07-X-1511). तपासणी केली असता, महिंद्रा जिनीओ गाडीमध्ये 8 आणि आयशर गाडीमध्ये 11, अशी एकूण 19 गोवंश जातीची जनावरे आढळली. ही जनावरे दाटीवाटीने, दोरीने जवळ-जवळ बांधलेली होती. त्यांना पाणी किंवा चारा दिला नव्हता आणि ती वेदनादायक अवस्थेत होती.
या दोन्ही गाड्यांच्या चालकांकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे जनावरे वाहतुकीचा परवाना किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तपासणी प्रमाणपत्र नव्हते.
आरोपींची नावे आणि दाखल केलेले गुन्हे
पोलिसांनी चालकांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सांगितली:
* विनायक मनोहर भोईटे, वय 38, रा. पांगरी रोड, रेणुकानगर, निपाणी, शिरगुप्पी, ता. चिकोडी, जि. बेळगावी, कर्नाटक. (महिंद्रा जिनीओचा चालक) .
* समीर बाळासो मुजावर, वय 31, रा. वॉर्ड नं. 24, कारंडेमळा, गल्ली नं. 3, शहापूर इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. (आयशर गाडीचा चालक) .
या दोन्ही चालकांनी सांगितले की त्यांनी ही जनावरे तबरेज चाँदनीयाँ ठाकूर, रा. परटवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी याच्याकडून आणली होती.
या तिन्ही आरोपींवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 आणि मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत विविध कलमांचा समावेश आहे.
जप्त केलेला मुद्देमाल आणि पुढील तपास
या गुन्ह्यात एकूण 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही वाहने आणि जनावरे जप्त केली आहेत, ज्यांची एकूण किंमत ₹20,66,000 आहे. तसेच, 19 गोवंश गुरांची सुटका करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. यात श्रेणी पो.उनि. श्री ओगले, स.पो.फौ. गोरे, पो.हवा/251 झोरे, पो.हवा/301 पालकर, पो.हवा/288 राजवैद्य, पो.हवा/1067 कदम, पो.हवा/1362 सवाईराम, पो.हवा/1408 शेट्ये आणि चा.पो.कॉ/215 कांबळे यांचा सहभाग होता.













