रत्नागिरी ः मध्यरेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्र. १२ आणि १३च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वेगाड्यांच्या सेवांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत काही लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबई सीएसएमटीऐवजी ठाणे आणि दादर स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट होणार आहेत. त्यामुळे मंगळूर जंक्शन-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे स्थानकावर, मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दादर स्थानकावर तर मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी दादर स्थानकावर थांबणार आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेने केले आहे. प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर रेल्वेसेवा पूर्ववत सुरू होईल.












