दोन वर्षांपासून फरार आरोपी पुण्यातून जेरबंद!

मोशीतील कचरा डेपो परिसरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

 

अपहरण आणि धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या विलास संभाजी वसेकर (वय ३५, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुण्यातील मोशी येथून ताब्यात घेतले. गोपनीय माहिती आणि मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कुडाळ पोलीस ठाण्यात १४ ऑक्टोबर २०२४ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक २४७/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विलास वसेकर हा गुन्हा घडल्यापासून स्वतःचे अस्तित्व लपवून फिरत होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक त्याचा सातत्याने शोध घेत होते.

दरम्यान, आरोपी पुण्यातील मोशी येथील कचरा डेपो परिसरात अँथनी लारा रिन्यूएबल एनर्जी या कंपनीत काम करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्याचबरोबर त्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून पथकाने त्याचा ठावठिकाणा निश्चित केला. त्यानुसार २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास त्याला मोशी, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले.

आरोपीची गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून २७ ऑक्टोबर रोजी पहाटे चारच्या सुमारास त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कुडाळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

आरोपीविरुद्ध अन्य गुन्हेही दाखल

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास वसेकर याच्याविरुद्ध सोलापूर ग्रामीणमधील बार्शी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४-ब आणि ३५४-अ यांसह एकूण तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, सदानंद राणे, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि प्रथमेश कदम (मोपवि) यांचा समावेश होता.