सुलभ शौचालयातील अस्वच्छता, तुटलेले दरवाजे, पाणी आणि विजेचा अभाव; सहा महिन्यांपासून निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा भाजपचा आरोप
खेड (प्रतिनिधी) : खेड बसस्थानकातील सुलभ शौचालयाच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या गंभीर समस्येकडे एसटी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत भाजप खेड शहराच्या वतीने चिंपाट आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एसटी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून महायुती सरकारला बदनाम करण्याचा एसटी प्रशासनाचा डाव असल्याचा आरोपही यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आला.
खेड बसस्थानकातील सुलभ शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, तेथे प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान निदर्शनास आणून दिले. शौचालयाचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर वीज आणि पाण्याचीही पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय शौचालयातील घाण आणि मैल बाहेर येत असल्याने परिसरात अस्वच्छता पसरली असून, त्यामुळे खेड शहरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित एवढा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाही एसटी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही केली जात नसल्याबद्दल भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली.
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात येत असल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, वारंवार निवेदने देऊनही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले. शौचालयाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेला ठेकेदारही आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित करत भाजप कार्यकर्त्यांनी एसटी प्रशासनाला धारेवर धरले.
खेड बसस्थानकात दररोज सुमारे चार ते पाच हजार प्रवाशांची ये-जा होत असते. यामध्ये महिला आणि मुलींची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकातील शौचालयाची अवस्था इतकी खराब असेल, तर नैसर्गिक गरजांसाठी महिला, मुली आणि इतर प्रवाशांनी जायचे कुठे, असा संतप्त सवाल भाजपच्या वतीने उपस्थित करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना प्रवाशांना अशा गैरसोयींचा सामना करावा लागणे दुर्दैवी असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत त्यांना संबंधित सुलभ शौचालयात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याची विनंती केली. कागदोपत्री आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी एस टी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली व याबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता त्याने आपली जबाबदारी झटकून हात वर केल्याचे पहावयास मिळाले. यावेळी शौचालयाची स्वच्छता, तुटलेल्या दरवाजांची दुरुस्ती, पाणी आणि वीजपुरवठा यांसह आवश्यक सुविधांची तातडीने पूर्तता करावी अन्यथा भाजपा उग्र आंदोलन उभारले असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा मिळणे आवश्यक असताना या प्रश्नाकडे दीर्घकाळ दुर्लक्ष होत असल्याने भाजपने एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महायुती सरकारच्या काळात प्रवाशांच्या सुविधांबाबत सरकारची प्रतिमा मलिन होईल, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनात भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर, भाजप खेड शहराध्यक्ष भालचंद्र साळवी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खेड बसस्थानकातील सुलभ शौचालयाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून प्रवाशांना दिलासा द्यावा, अन्यथा या प्रश्नावर तीव्र भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला.












