नेमके काय घडले दहीहंडी दिवशी खंडाळ्यातील त्या बार मधे
रत्नागिरी : दुसऱ्या तरुणीसोबत विवाह ठरल्यानंतर प्रेयसीने जाब विचारताच झालेल्या वादातून संतप्त प्रियकराने तरुणीची गळा आवळून तालुक्यातील खंडाळा येथे हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह आंबा घाटात फेकून देण्यात आला. तब्बल चौदा दिवसानंतर या घटनेचा उलगडा झाला असून, मिरजोळे येथील भक्ती मयेकर असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा मृतदेह शनिवारी रात्री पोलिसांना सापडला. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (26), बार मॅनेजर विश्वास पवार (35), कारचालक सुशांत नरळकर या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. दुर्वास पाटील याने वर्षभरापूर्वी कामगाराची हत्या केल्याचा पोलिसांना संशय असून त्याच्या विरोधात जयगड पोलीस स्थानकात खुनाचा दुसरा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री सुरु होते. संबंधित कामगार बेपत्ता झाल्याची तक्रार जयगड पोलीस स्थानकात दाखल आहे. पहिला खून पचवता आल्यामुळे दुर्वासने दुसरा खून करण्याचे धाडस दाखवले असल्याचे सांगितले जात आहे.
मिरजोळे येथील भक्ती मयेकर ही तरुणी फायनान्स सेक्टरमध्ये नोकरी करत होती. त्यामुळे तिचे वास्तव्य रत्नागिरी शहरात होते. याचदरम्यान खंडाळा येथील देशीबार मालकाशी तिची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमप्रकरण सुरू असतानाच प्रियकराचा दुसऱ्या तरुणीशी विवाह ठरल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर तिने प्रियकरासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. गेले काही दिवस त्यांच्यामध्ये वाद सुरू होते.
दहीहंडीच्या दिवशी दि. 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी भक्ती खंडाळा येथील प्रियकराच्या देशी बारजवळ गेली होती. बारच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. आपली फसवणूक करू नको असे भक्ती प्रियकराला सांगत होती. यातून हा वाद विकोपाला गेला. प्रियकराने खोलितच भक्तीचा गळा आवळून खून केला. भक्ती निपचीत पडल्यानंतर मृतदेहाचे कारायचे काय? असा प्रश्न त्याला पडला. तोपर्यंत रात्र झाली होती.
भक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने बारच्या मॅनेजरसह एका कारचालकाची मदत घेतली. खंडाळा येथे मृतदेह गाडीत भरून त्यांनी थेट आंबाघाट गाठला. आंबा घाटातून मृतदेह खोल दरीत फेकण्यात आला. त्यानंतर पुन्हा खंडाळा येथे परतले.
दि. 16 ऑगस्टपासून भक्ती गायब झाली होती. नातेवाईंकांनी सर्वत्र शोधाशोध केली. परंतु भक्ती कोठेच आढळून आली नाही. अखेर दि. 21 ऑगस्ट रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी शहर पोलीस स्थानकात दाखल केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने भक्तीचा शोध सुरू केला. भक्तीचे बेपत्ता होण्यापूवचे मोबाईल लोकेशन काढण्यात आले. दि. 16 ऑगस्टला भक्ती खंडाळा येथे गेल्याचे निष्पन्न झाले. भक्ती ज्याच्याशी वारंवार बोलत असे तो तिचा प्रियकर खंडाळा येथेच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत आपल्याला काहीच माहिती नाही भक्ती आपल्या येथून निघून गेली असे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी चातुर्य दाखवत प्रियकराकडून हत्येची कबुली करून घेण्यात यश मिळले.
भक्तीचा मृतदेह आंबा घाटात टाकल्याची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, लांज्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, रत्नागिरी उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह सुमारे 150 पोलीस कर्मचारी आंबाघाटात दाखल झाले. ताब्यात घेतलेल्या संशयिताने दाखविलेल्या ठिकाणापासून पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले. रात्री उशीरा भक्तीचा मृतदेह सापडला.
सुमारे 14 दिवसांपूव भक्तीची हत्या करून घाटात टाकलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे काम शनिवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
या घटनेमुळे मिरजोळे गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे. प्रेमसंबंधाचा असा शोकांत शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
फेसबुकवर ओळख , टॅटूने ओळख पटवली
भक्ती व दुर्वास यांची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर त्याचे प्रेमात रूपांतर झाले. तर १४ दिवसांपूर्वी भक्तीची हत्या झाल्यामुळे मृतदेह सडलेला होता, भक्तीच्या हातावरील टॅटूने तिची ओळख पटविली .













