राजापूर: तालुक्यातील ओशिवळे, गुरववाडी येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:०० ते २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अनिल दत्ताराम गुरव (वय ५१) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते झिमाजी रामचंद्र गुरव यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे दरवाजे आणि तिजोरी फोडून १००० रुपये रोख, १००० रुपये किमतीचा वॉटर कुलर, ३०० रुपयांचा होम थिएटर आणि १००० रुपये किमतीचे ड्रिल मशीन असा एकूण ३,३०० रुपयांचा माल लंपास केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५(क), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.













