खोक्रल येथे तळीची साफ सफाई करताना विजेचा शॉक 

एकाचा मूत्यू तर उपसरपंच जखमी

 

दोडामार्ग प्रतिनिधी

खोक्रल येथे गणेश विसर्जन स्थळी साफसफाई करण्यासाठी गेले असता तेथील विद्युत वाहिन्यांचा स्पर्श होऊन सूर्याजी साबाजी कुबल ( वय २५ ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेल्या गावचे उपसरपंच भरत लक्ष्मण गवस ( वय ३२ ) यांना सौम्य धक्का लागल्याने पुढील उपचारासाठी आझिलो रुग्णालयात म्हापसा गोवा येथे हलविण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन असल्याने गावातील विसर्जन स्थळी साफसफाई करण्यासाठी सूर्याजी कुबल व गावचे उपसरपंच भरत गवस हे दोघे गेले होते. साफसफाई करत असताना तेथील झाडी झुडुपे मारत असताना विद्युत वाहिन्यांचा सूर्याजी कुबल याला नकळत स्पर्श झाल्याने त्याला जोराचा झटका बसत जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या उपसरपंच भरत गवस यांना ही त्याचवेळी वीजेचा धक्का लागला परंतु त्यांच्या पायात चप्पल असल्याने ते बाजूला फेकले गेले व बालंबाल बचावले. त्यांनी आरडाओरड केल्याने जवळील स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. व त्यांना तत्काळ खाजगी वाहनाने साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तत्पूर्वी सूर्याजी याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच भरत यांच्यावर उपचार सुरू केले. व अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने आझीलो गोवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू झाल्याचे स्पष्ट केल्यानंतरही ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा सूर्याजी याची तपासणी करण्याससांगितले. त्यावेळी डॉ. जगदीश पाटील यांनी इसीजी करून सूर्याजी हा मयत झाल्याचे स्पष्ट केले. हे ऐकताच नातेवाईक व ग्रामस्थांनी एकच हंबरडा फोडला. रुग्णालयात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.