देवगड, जि. सिंधुदुर्ग, ४ ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अवैधरीत्या मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने आज पहाटे कठोर कारवाई केली. कर्नाटक राज्यातील ‘श्री माता’ या नौकेस जप्त करण्यात आले असून, नौका देवगड बंदरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. ही कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ तसेच सुधारणा अधिनियम, २०२१ च्या तरतुदींनुसार करण्यात आली.
दि. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजता देवगड समुद्रक्षेत्रात सुमारे १६ ते १७ वाव पाण्यात नियमित गस्तीदरम्यान अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी श्री. किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा रक्षकांच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली. कर्नाटक राज्याच्या जलक्षेत्रासाठी परवाना असलेली ‘SHREE MATHA’ (नोंदणी क्रमांक IND-KA-02-MM-2803) ही नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे गिलनेट मासेमारी करताना आढळली. नौकेची मालकी श्रीमती हर्षिनी शशिधर बी. कुंडेर, रा. मल्लपी, उडुपी (कर्नाटक) यांच्याकडे आहे.
या नौकेवर तांडेलसह एकूण १० खलाशी उपस्थित होते. नौका ताब्यात घेतल्यानंतर ती देवगड बंदरात आणण्यात आली. नौकेवर सापडलेल्या मासळीचा लिलाव प्रक्रिया सुरू असून, याबाबतचा संपूर्ण अहवाल मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. सुनावणीनंतर नौकेच्या मालकांवर कायदेशीर कारवाई होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ही यशस्वी कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. किरण वाघमारे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक यांच्या सहकार्याने पार पडली.
या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील स्थानिक मच्छिमार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. परप्रांतीय नौकांमुळे गिलनेट धारक मच्छिमारांच्या जाळ्यांचे वारंवार नुकसान होत असल्याचे तसेच मासेमारीसाठी जागा उपलब्ध न होणे आणि जाळे उठविण्यास भाग पाडले जाणे यासारख्या तक्रारी स्थानिक मच्छिमारांकडून नियमितपणे येत होत्या. या कारवाईमुळे स्थानिक मच्छिमारांना दिलासा मिळाला आहे.
मा. पालकमंत्री तथा मंत्री मत्स्यव्यवसाय व बंदरे श्री. नितेशजी राणे यांच्या निर्देशांचे काटेकोर पालन करत मत्स्यव्यवसाय विभाग सागरी हद्दीतील अवैध मासेमारी रोखण्यासाठी सतर्क आहे. विभागाने स्पष्ट केले की, भविष्यातही अशा अवैध मासेमारीविरोधात कठोर कारवाई सुरू राहील.













