वीस – पंचवीस वर्षापूर्वी पंढरपूर यात्रेला मग आषाढी असो की, कार्तिकी ! एखादुसरा लाख वारकरी पंढरपूरात ह्जेरी लावायचे. आजच्या यात्रेत साधारपणे 10 लाख वारकरी पंढरपूर यात्रेत हजेरी लावून पांडूरंग- रुक्मिणीचे दर्शन घेऊन धन्य होतात.
पतितांचा उद्धार हे पांडूरंगाचे ब्रीद आहे. 12 व्या शतकातील खास्ट ब्राह्मण्याची चौकट मोडून अठरापगड जाती जमातींच्या लोकांना भक्तीची दारे खुली करण्याची मुहूर्तमेढ रोवली; आणि ‘हे विश्वचि माझे घर’ हा ज्ञान प्रकाश ज्ञानेश्वरांनी पेरला. आज पंढरपूरची यात्रा हे त्या ……
‘इवलेसे रोप |लावियले द्वारी |
त्याचा वेलू गेला | गगनावरी ||’
भक्ती हा पंढरपूर यात्रेचा प्राण आहे आणि तोच उद्देश आहे. पाऊस , वादळ, उन काहीही असो. नित्यपणे पांडुरंगाचा अखंडपणे जयघोष करीत हजारो पालख्या आनंदाने, आतुरतेने पायवाट तुडवीत पंढरपूर जवळ करतात. वेदामध्ये ‘वसुदेव कुटुंबकम’ ही संकल्पना व्यासांनी माडंली; तीच संकल्पना ‘ हे विश्वचि माझे घर | ऐसी मति जयाचि स्थिर | किंबहुना चराचर | आपण जहाला ||’ वारकरी संप्रदायाची स्थापना करताना ज्ञानदेवांच्या पुढे ही विशाल, पवित्र संकल्पना होती.
केवळ वारी पुरते नव्हे तर यच्ययावत विश्वातील मनुष्यात प्रेम, वात्सल्य नीर अहंकारिता निर्माण व्हावी अशी विशाल भावना ज्ञानेश्वरांची होती. मनातील उर्मी हा भक्ती धागा ज्ञानेश्वरांनी पकडला आहे.
‘मनाचिये मनी गुंतीयेला शेला |
मोगरा फुलला मोगरा फुलला ||’
मोगऱ्याची उपमा ज्ञानेश्वरांनी संतांच्या मांदियाळीला दिली आहे. प्रत्येक कुटुंबातील प्रौढ व्यक्ती भक्तीचा धागा पुढील पिढीत रुजवितो आणि स्वत: निवृत्त होतो. जसा मोगरा रात्री भरतो आणि सकाळी फुलतो. पुन्हा बहरतो. तसे हा भक्ती ठेवा सतत फुलत – बहरत आहे. आषाढ वारीहून सरळ – वाकडे होतात ; तोपर्यंत कार्तिकी येते. आषाढी पेरल्या रानांनी दिसते. तर कार्तिकी भरल्या पिकांनी दिसते. आषाढीला देवशयनी जातात तर कार्तिकीला जागर होतो. किती सुंदरपणे ‘ वारी’ प्रक्रियेचे चक्र बसविले आहे ?
वारीमध्ये मनोरंजनही आहे. भक्तीने ओथंबलेले अभंग , शृंगाराची ओढ असलेल्या गौळणी आबालवृद्ध गातात, ऐकतात हेच ते वारीचे सुकृत होय ! मुक्कामावर हरिपाठाचे अभंग, तुकारामाची गाथा, एकनाथांचे रामायण, नारदीय कीर्तन, झिम्मा, फुगडी, आट्यापाट्या, हुतूतू हे व्यायामांचे प्रकार असा दिनक्रम असल्यामुळे कोण आठवेल त्या संसारा ! अशी बिनव्याजी वारी महाराष्ट्रातील लोक करतात.
इरावती कर्वे या अवलियाने महाराष्ट्राची व्याख्या करताना …..’’ ज्या देशातील लोक पंढरपूरला येतात हो महाराष्ट्र ! ‘’ अशी केली आहे. आजची वारी तुम्हा -0 आम्हां सर्वांची वारी आहे. संसार ताप हरी म्हणजे हरण करी टी वारी sss. वारी वारी जन्ममरणाते वारी’ म्हणजे जन्म मरणाचे भय राहत नाही. म्हणून करी वारी. ‘वारी करी तो वारकरी अशी वारी’ संकल्पना आहे.
‘ विठ्ठल आणि रुक्मिणी’ हे नि: शरजी देव आहेत. त्यांच्या हातामध्ये कोणतेही शस्त्रास्त्र नाही. तसेच दोन्ही हात कंबरेवर आहेत. त्यामुळे फक्त नजरेने पाहणारे देव आहेत. पति – पत्नीने संसारात राहताना तटस्थपणे राहिले पाहिजे तो आदर्श भक्तासमोर आहे ; म्हणून त्यांची मंदिरे एकमेकापासून विलग आहेत.
इंटरनेट आणि दूरदर्शन मुळे पंढरपूर यात्रेची क्षणाक्षणाची चित्रे, व्हिडिओ जगभर दिसतात. ‘ हे विश्वचि माझे घर’ ही ज्ञानेश्वरांची विश्वात्मदृष्टी सुफल झाली आहे.
वेदांनी, पुराणांनी इ. पू. 4 थ्या शतकामध्ये ‘वसुदेव कुटुंबकम’ ही संकल्पना ज्ञानेश्वरांच्या मुखातून पुन: रुच्यारीत झाली, तसेच आज अस्तित्वात आल्याचे सार्थक होते.
सर्व ‘पापा’ पासून काया , वाचा, मने करून दूर राहणारा हा संप्रदाय आहे. द्या, क्षमा, शांती हे जी गुण वाढविणारा हा पंथ आहे. कोणत्याही एका धर्माचा डांगोरा न पीटता विश्व धर्माची संकल्पना दिवसेंदिवस वाढविणारे प्रयत्न या पंथात आहेत ; म्हणजेच वारी संस्कारात आहे.
भजन कीर्तनाच्या माध्यमातून ध्यानधारणेच्या साधनेतून, ग्रंथ निर्मितीच्या प्रयत्नातून , प्रवचनांच्या बैठकीतून हा पंथ उभारतो आहे. ‘ हे विश्वचि माझे घर’
12 व्या शतकामध्ये स्थापन झालेल्या ‘वारकरी संप्रदाय’ चा प्रभाव श्री दत्त संप्रदाय , श्री नाथ संप्रदाय . लिंगायत संप्रदाय, समर्थ संप्रदाय इत्यादी संप्रदायावर तर आहेच ! तथापि आज महाराष्ट्राती भजन पुजनातून , कीर्तन रंगातून घरोघरी पोहोचलेला आहे. हे या पंथाचे फलित आहे.
प्राचार्य डॉ. विश्वास पाटील,
प्रा. आबा सावंत कॉलेज, साखरपा.










