शिक्षकदिनी एक हात मदतीचा : दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणारा उपक्रम

गुहागर | प्रतिनिधी :
गुहागर तालुक्यातील निगुंडळसारख्या दुर्गम खेड्यातील दोन हुशार मुलींचे शिक्षण आता थांबणार नाही. पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या व रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या सरचिटणीस तसेच सेवार्थ फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. संपदा कुंटे यांनी या दोन्ही मुलींच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. ५ सप्टेंबर, शिक्षक दिनी शैक्षणिक साहित्य वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ झाला.

निगुंडळ येथील पायल धामणस्कर (इ.११ वी सायन्स) आणि मंजिरी धामणस्कर (इ.७ वी) या दोन बहिणींचे पालक मजुरी करतात. घरची बेताची परिस्थिती असूनही मुली अत्यंत हुशार आहेत; मात्र वाढत्या खर्चामुळे त्यांचे शिक्षण धोक्यात आले होते. हे लक्षात घेऊन प्रज्ञा धामणस्कर-ताम्हणकर व संदीप चव्हाण यांनी पुढाकार घेतला व त्यातून सौ. कुंटे यांच्यामार्फत ही मदत मिळाली.

सौ. कुंटे यांनी यापूर्वीही सेवार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून तळवली येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत केली होती. या वेळी त्यांनी 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीच्या दोन्ही मुलींचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली.

या मदतीमुळे फक्त दोन मुलींचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उजळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. या वेळी संदीप चव्हाण, प्रज्ञा धामणस्कर-ताम्हणकर, मुलींचे पालक, संदीप खोले, निष्णात ताम्हणकर आदी उपस्थित होते. शिक्षक दिनाच्या निमित्ताने घडलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रेरणादायी ठरला.